क्रिकेटच्या नियमात बदल होणार! ज्युनियर स्तरावर बाऊन्सरवर बंदी येण्याची शक्यता

क्रिकेट या खेळाचे नियम बनवणारी संस्था मेरीलीबोन क्रिकेट क्लब (एमसीसी) आता या खेळाच्या नियमांमध्ये बदल करण्याच्या तयारीत आहे. बाऊन्सर, डीआरएस, महिलांचे क्रिकेट आणि चेंडूला लाळ लावण्यावरील बंदी या विषयांवर एमसीसीच्या बैठकीत चर्चा झाली. जागतिक क्रिकेट कमिटीच्या प्रमुखपदी इंग्लंडचे माईक गॅटिंग असून यामध्ये हिंदुस्थानचा सौरभ गांगुली, श्रीलंकेचा कुमार संगक्कारा आणि ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न यांचाही समावेश आहे. बॅट व बॉल यांचा समतोल राखला गेला पाहिजे असा सूर या बैठकीमधून उमटला. एमसीसीची पुढील बैठक ऑगस्ट महिन्यात होणार असून नियमांमध्ये बदल 2022 सालांमध्ये होण्याची शक्यता आहे.

स्पिनर्सविरोधात खेळतानाही हेल्मेट अनिवार्य

बाऊन्सरमुळे खेळाडूंच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ज्युनियर स्तरावर किंवा तळाच्या फलंदाजांना बाऊन्सर टाकायचे नाहीत अशी भूमिका एमसीसीकडून घेण्यात आली आहे. तसेच स्पिनर्स अर्थातच फिरकी गोलंदाजांविरुद्ध खेळतानाही फलंदाजांनी हेल्मेट घालणे अनिवार्य असणार आहे. बॅट व बॉल यांचा समतोल राखणे गरजेचे आहे. त्यामुळे शॉर्ट पिच चेंडूवर बंदी आणता येणार नाही, असेही सदस्यांकडून स्पष्ट करण्यात आले.

चेंडूला लाळ लावायची की नाही?

कोरोना हा आजार संसर्गाने पसरतो. त्यामुळे क्रिकेटमध्ये चेंडूला लाळ लावण्यावर बंदी आणली. पण आता ही बंदी कायमस्वरूपी ठेवायची का, याही प्रश्नावर बैठकीत विचारमंथन झाले, पण ठोस निर्णय घेण्यात आला नाही. खेळाडूंशी सल्लामसलत केल्यानंतर या नियमात बदल केला जाईल अशी भूमिका यावेळी घेण्यात आली.

आता ‘अंपायर्स कॉल’ला बायबाय

मैदानातील खेळाडूंनी फलंदाजी करणाऱया संघाविरुद्ध पायचीतच्या निर्णयाविरुद्ध डीआरएसची मागणी केल्यानंतर ‘रिह्यू’मध्ये मैदानातील पंचाची चूक दिसली तर ‘अंपायर्स कॉल’ नसावा अशी भूमिका यावेळी घेण्यात आली आहे. चेंडू स्टंपला 50 टक्के लागला असेल तर त्या फलंदाजाला बाद द्यायला हवे. या नियमात बदल झाल्यास एक अयशस्वी रिह्यू कमी करण्यात येईल. तसेच महिलांच्या क्रिकेट लढती वाढवण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी सदस्यांकडून स्पष्ट करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या