मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांच्या आत्मचरित्राचे दुबईत प्रकाशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

“दुबईमध्ये 38 वर्षांपूर्वी वडिलांनी थाटलेल्या लहानशा किराणा दुकानात मदत करायला मी हिंदुस्थानातून आलो. जिद्द, कष्ट, प्रामाणिकपणा, सौजन्य व ग्राहकसेवा या पंचसूत्रीमुळेच मला व्यवसायात उत्तुंग यश लाभले आणि एका सामान्य दुकानदारापासून ते मसालाकिंग बनण्यापर्यंत माझा प्रवास झाला’’, असे प्रतिपादन अल अदिल समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ‘मसालाकिंग’ डॉ. धनंजय दातार यांनी नुकतेच दुबईत केले.

अल अदिल या समूहाच्या 38 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दुबईतील ऍड्रेस हॉटेलमध्ये एका शानदार समारंभाचे आयोजन करण्यात आले. डॉ. दातार यांनी लिहिलेल्या ‘मसालाकिंग-ए जर्नी ऑफ मेमॉयर्स’ या इंग्रजी आत्मचरित्राचे प्रकाशन यावेळी गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत झाले.

कार्यक्रमाला डॉ. दातार यांची पत्नी वंदना, पुत्र हृषिकेश आणि रोहित यांच्यासह दुबईतील विविध क्षेत्रांतील मान्यवर, ‘अल अदिल’चा कर्मचारी वर्ग व ग्राहक उपस्थित होते. सुरेश वाडकर यांच्या मधुर गीतांनी सजलेला हा कार्यक्रम दुबईकरांसाठी अविस्मरणीय ठरला. “व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल तर सुरक्षित, शुद्ध व भेसळमुक्त उत्पादने तसेच सौजन्यपूर्ण सेवा देऊन ग्राहकांना काटेकोर जपावे. कारण अखेर तेच आपल्याला नाव व कीर्ती मिळवून देतात. मला दुबईच्या शासकांनी ‘मसालाकिंग’ हा बहुमान देऊन गौरविले. यामागे माझे कर्मचारी, ग्राहक यांचा विश्वास कारणीभूत आहे  असे डॉ. दातार यांनी स्पष्ट केले.