
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या आणि हिंदुस्थानच्या संसद आणि पुलवामा हल्ल्यासह अनेक दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार मसूद अझर याला संयुक्त राष्ट्रसंघाने आज आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले. गेल्या दहा वर्षांपासून मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावे म्हणून संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत हिंदुस्थानने पाठपुरावा केला होता; मात्र चीनच्या छुप्प्या पाठिंब्यामुळे आणि आडमुठ्या धोरणामुळे अझरला दहशतवादी घोषित करण्यात अडचणी येत होत्या.
हिंदुस्थानने 10 वर्षे केला पाठपुरावा
मसूद अझरने 2000 साली ‘जैश ए मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेची स्थापना केली. त्यानंतर हिंदुस्थानात संसदेवरील हल्ला, पुलवामा हल्ल्यासह अनेक घातपाती कारवाया केल्या. त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावे यासाठी हिंदुस्थानने गेली
10 वर्षे पाठपुरावा केला आणि त्याच्याविरोधात चार प्रस्ताव मांडले, मात्र सुरक्षा परिषदेत चीनने पाकिस्तानची पाठराखण करत अझरला दहशतवादी घोषित करण्यात खोडा घातला. मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यानंतर आता त्याची जगातील सर्व मालमत्ता गोठवली जाणार आहे. त्याचबरोबर त्याच्या प्रवासावर बंदी घालण्यात येणार आहे. त्याच्याशी संबंधीत थेट किंवा अप्रत्यक्ष आर्थिक निधीचा पुरवठा करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थावरही कारवाई करता येणार आहे.
चीनने साथ सोडली
जगभरातून पाकिस्तानने अझरवर कठोर पाऊले उचलण्यासाठी दबाव येत होता. त्यात पुलवामानंतर हा दबाव वाढला. पुलवामानंतर अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी सुरक्षा परिषदेत चौथ्यांदा प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र, त्यातही हिंदुस्थानला अपयश आले. पण पाकिस्तान आणि चीनवरील आंतरराष्ट्रीय दबाव वाढला. शेवटी आज चीनने सर्व तांत्रिक मुद्दय़ांचा आम्ही पुनर्विचार केला असून त्यात काही आक्षेपार्ह सापडले नाही, असे स्पष्ट करत अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यावर अप्रत्यक्षपणे शिक्कामोर्तब केले.
फ्रान्सने केले स्वागत
गेल्या अनेक वर्षांपासून मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. पुलवामा हल्ल्यानंतर हे प्रयत्न अधिक वाढवण्यात आले. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे आम्ही स्वागत करतो, असे फ्रान्सने म्हटले आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर अधिक कठोर धोरण
जम्मू-कश्मीरमध्ये 14 फेब्रुवारीला पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर जैशच्या दहशतवाद्यांनी स्फोटके असलेली गाडी धडकवून केलेल्या आत्मघाती हल्ल्यात हिंदुस्थानचे 40 जवान शहीद झाले. त्यानंतर या कटाचा सूत्रधार असलेल्या अझरविरोधात अधिक कठोर पावले उचलत त्याला दहशतवादी घोषित करण्यासाठी हिंदुस्थानने जगभरातील देशांचा पाठिंबा मागितला. यात अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्स यांनी पाठिंबा दिला, तर चीनने नकार दिला.
























































