दिल्लीत अग्नितांडव! रिठाळा मेट्रो स्थानकाजवळील झोपडपट्टीला आग; 500 झोपड्या जळून खाक, एकाचा मृत्यू

राजधानी दिल्लीतील रोहिणी भागात येणार्‍या रिठाळा मेट्रो रेल्वे स्थानकाजवळील झोपडपट्टीला शुक्रवारी रात्री भीषण आग लागली. रात्री अकराच्या सुमारास लागलेल्या या आगीमध्ये 500 हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या. जवळपास पाच एकर वर पसरलेल्या बंगाली बस्ती या झोपडपट्टीला लागलेल्या आगीमध्ये होरपळून एकाचा मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाला आहे. दिल्ली अग्निशमन विभागाने (डीएफएस) ही माहिती दिली.

रिठाळा मेट्रो स्थानकाजवळ जवळपास पाच एकरवर ‘बंगाली वस्ती’ नावाची झोपडपट्टी आहे. येथे रद्दी, प्लास्टिक, भंगारचा व्यवसाय करणारे शेकडो लोक राहतात. याच वस्तीमध्ये रात्री अकराच्या सुमारास आग लागली. रद्दी, प्लास्टिकमुळे ही आग वेगाने पसरली आणि बघता बघता 500 हून अधिक झोपड्या आगीच्या कचाट्यात सापडल्या. अग्निशमन दलाला याची माहिती मिळताच जवळपास 24 गाड्या, पाण्याचे टँकर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. पहाटे पाचच्या सुमारास अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

आगीमध्ये लोकांच्या संसाराचा पार कोळसा झाला. आग विझवल्यानंतर जळून खाक झालेला संसार, गाड्या, सायकल आणि इतर संसारोपयोगी वस्तूंचा खच पडला होता. ही दृश्य पाहून वस्तीतील नागरिकांनी हंबरडा फोडला.

आगीमुळे परिसरात धुराचे लोट उठले होते. आगीत संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्यामुळे नागरिकांना रस्त्यावर रात्र काढावी लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र या आगीत 200-300 लोक बेघर झाले आहेत. प्रशासनाने त्यांची तात्पुरती राहण्याची, खाण्या-पिण्याची सोय केली आहे.

एकाचा मृत्यू

दरम्यान, आगीमध्ये होरपळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मुन्ना (वय – 30) असे मृताचे नाव असून राजेश (वय – 30) हा जखमी झाला आहे. त्याच्यावर सफदरजंग रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.