दुबईत बांधले जात आहे भव्य हिंदू मंदिर, मुस्लिम कट्टरतावाद्यांचा संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुबई शहरात उभारण्यात येत असलेल्या भव्य हिंदू मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दुबईच्या या आलिशान मंदिरात 16 देवी-देवतांच्या मूर्ती ठेवण्यात येणार आहेत. 4 ऑक्टोबर रोजी या मंदिराचे भव्य पद्धतीने अनावरण होणार आहे. UAE सारख्या मुस्लीम देशात हिंदू मंदिर बांधल्याची बातमी सोशल मीडियावर झाल्यानंतर आता महाभारत सुरु झाले आहे. अनेकांनी हे मंदिर बांधल्याबद्दल UAE चे कौतुक केले आहे. मात्र दुबईतील या मंदिराला मुस्लिम कट्टरतावादी कडाडून विरोध करत आहेत.

खलीज टाईम्सच्या वृत्तानुसार, हे मंदिर 5 ऑक्टोबरला जगभरातील भाविकांसाठी खुले केले जाईल. सिंधू गुरु दरबार मंदिराचे विश्वस्त राजू श्रॉफ यांनी याला दुजोरा दिला आहे. हे मंदिर दुबईच्या जेबेल अली भागात बांधले जात आहे. या भागात एक शीख गुरुद्वारा आणि अनेक चर्च देखील आहेत. या मंदिराच्या अनावरणप्रसंगी UAE चे सरकारी अधिकारी आणि प्रतिष्ठित पाहुणे उपस्थित राहणार आहेत. या मंदिरात लग्न, हवन आणि इतर खाजगी कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी दिली जाऊ शकते.

या मंदिरात एकावेळी 1000 ते 1200 भाविक पूजा करू शकतील. या मंदिराची छायाचित्रे UAE मधील रहिवासी हसन सजवानी यांनी ट्विटरवर शेअर केली आहेत. ही छायाचित्रे समोर आल्यानंतर कट्टरतावादी संतापले आहेत. हसन यांच्या ट्विटवर फैसल खान नावाच्या व्यक्तीने लिहिले की, ‘भाजपचे अतिरेकी हिंदू भारतात मशिदी नष्ट करत आहेत आणि UAE मधील लोक देशातील हिंदूंसाठी मंदिरे बांधत आहेत. तुमच्या राजाला किती पैशांची गरज आहे? यामागे तुमचे व्यावसायिक हित आहे.

कट्टरतावाद्यांनी या मंदिराला विरोध केला असला तरी यूएईच्या या निर्णयाचे अनेकांनी कौतुक केले आहे. हसन सजवानी यांचे ट्विट 5 हजारांहून अधिक वेळा रिट्विट झाले असून सुमारे 28 हजार लोकांनी त्याला लाईक केले आहे. या ट्विटवर कमेंट करताना आफताबने लिहिले की, ‘अविश्वसनीय…लोकांची मने जिंकण्याच्या बाबतीत UAE हा नेहमी अग्रेसर राहिला आहे. अरबांच्या भूमीवर मंदिर बांधण्याची परवानगी मिळेल असे कधीच वाटले नव्हते. हे इतर देशांसाठी हे एक चांगले उदाहरण आहे.