
लिंबूटिंबू संघ म्हणून गणल्या गेलेल्या अफगाणिस्तान आणि नेदरलॅण्ड्स संघांनी सनसनाटी विजयांची मालिका कायम ठेवत उपांत्य फेरी प्रवेशाचे स्वप्नही जिवंत ठेवले आहे. दोन्ही संघांना उपांत्य फेरीची संधी असून जो संघ लखनौच्या मन प्रसन्न करणाऱया हवेत विजयी हास्य राखेल, तोच अन्य संघांची धाकधूकही वाढवणार आहे. त्यामुळे सामना अफगाण आणि डचमध्ये असला तरी या सामन्यावर लक्ष पाकिस्तान, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघांचेही असेल.
अफगाणिस्तानने जगज्जेत्या इंग्लंडला हरवून वर्ल्ड कपमध्ये सनसनाटी निर्माण केली. याच विजयाने वर्ल्ड कपमध्ये खरी रंगत आणली. एवढेच नव्हे तर त्यांनी पुढे पाकिस्तान आणि श्रीलंका या माजी जगज्जेत्यांनाही धूळ चारत उपांत्य फेरीच्या दिशेने आपली पावले टाकली आहेत. अफगाणी संघाला सारेच कच्चालिंबू मानत होते, पण त्यांनी एकापाठोपाठ तीन माजी जगज्जेत्यांना हरवत ‘हम भी हैं जोश में’ असल्याचे अवघ्या जगाला दाखवून दिले. त्यामुळे अफगाण काहीही करू शकतो, यावर सर्वांचा विश्वास बसू लागला आहे. तसेच इंग्लंडला हरवणे हे तुक्का नव्हते. आमच्या संघातही दम असल्याची अफगाणिस्तानने सातत्याने दाखवून दिले आहे. आता लखनौत हा अफगाणी तोफा डच सैन्याला नामोहरम करत उपांत्य फेरीत धडक मारण्यासाठी उत्सुक आहेत. जर अफगाण संघाने नेदरलॅण्ड्सला हरवण्यात यश मिळविले तर पाकिस्तान आणि न्यूझीलंड या संघांच्या पोटात गोळा येणार हे सत्य आहे.
तसेच डचने अफगाणवर मात केली तर त्यांचेही आव्हान कायम राहणार आहे. डचने आतापर्यंत दोन विजय मिळविले आहेत आणि त्यांना यानंतर इंग्लंड आणि हिंदुस्थान या संघांशीही भिडायचे आहे. तसेच अफगाणची लढत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दिग्गज संघांशी होणार आहे. त्यामुळे अफगाण विजयाची हॅटट्रिक करून खळबळ माजवतो की डच आपला प्रभावी खेळ दाखवतात हे उद्याच कळू शकेल. पण विजयाची संधी दोघांना आहे. सोने कोण करतो, ते पाहूया.

























































