सगळ्या क्रिकेट मॅच फिक्स असतात, बुकी संजीव चावलाची खळबळजनक माहिती

1032

2000 साली घडलेल्या मॅच फिक्सिंग प्रकरणी बुकी संजीव चावला याची चौकशी सुरू आहे. दिल्ली पोलीस त्याची चौकशी करत असून त्याने म्हटलंय की कोणताच सामना हा निष्पक्ष पद्धतीने खेळवला जात नाही. जे सामने क्रिकेटरसिक बघतात त्याचे निकाल आधीपासूनच ठरलेले असतात. क्रिकेटचे सामने हे चित्रपटांसारखे असतात ज्यात पुढे काय होणार हे आधीच ठरवण्यात आलेलं असतं. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या डॉ.जी.राम गोपाळ नाईक यांच्या जीवाला धोका असल्याचेही चावलाने सांगितले आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीत म्हटलंय की दिल्लीत जन्मलेल्या आणि लंडनमध्ये राहणाऱ्या संजीव चावलाने त्याचे सट्टेबाजांशी असलेले संबंध कबूल केले आहेत. फिक्सिंग प्रकरणात एक मोठी टोळी असून याबाबत अधिक माहिती दिली तर मला ते ठार मारतील अशी भीतीही चावलाने व्यक्त केली आहे. दिल्ली पोलिसांनी चावलाच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. ज्यामध्ये त्याचा जबाबही आहे. या जबाबावर चावलाची सही मात्र नाहीये. पोलिसांनी न्यायालयात सांगितले की तपासामध्ये सहकार्य करत नसल्याने चावला हा गुन्ह्यात सामील असल्याचे सिद्ध होत आहे. चावलाला याच महिन्यात जामीन मिळाला असून दिल्ली पोलिसांनी जामीन देण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.

2000 साली दक्षिण आफ्रिकेचा संघ हिंदुस्थान दौऱ्यावर आला होता. त्यावेळी पाहुण्या संघाचा कर्णधार हॅन्सी क्रोनिए होता. हॅन्सी आणि चावलामध्ये झालेले संभाषण पोलिसांनी टॅप केले होते. यामुळे या फिक्सिंग प्रकरणाचा खुलासा झाला होता. हे संभाषण उघडकीस आल्यानंतर हॅन्सीने पैशांच्या बदल्यात खराब खेळल्याचे मान्य केले होते. यामुळे त्याच्यावर क्रिकेट खेळण्यास आजीवन बंदी घालण्यात आली होती. क्रोनिएचा एका हवाई अपघातात मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूवरून बऱ्याच शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. चावला आणि दाऊद इब्राहीम यांचे घनिष्ट संबंध होते असंही पोलिसांनी सांगितलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या