
घणसोली येथील सिम्प्लेक्स परिसरातील माथाडी कामगारांच्या सात इमारती धोकादायक झाल्या असल्या तरी त्यांचा पुनर्विकास लटकला आहे. या इमारतीमधील हजारो कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून 180 चौरस फुटांच्या लहान घरात भीतीच्या सावटाखाली वास्तव्य करीत आहेत. हा रखडलेला पुनर्विकास लवकरात लवकर व्हावा यासाठी आक्रमक झालेल्या माथाडी कामगारांच्या गृहिणींनी महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढून अतिरिक्त आयुक्तांना घेराव घातला.
सिडकोने 2004 मध्ये घणसोली येथील सिम्प्लेक्स सोसायटी उभी केली. या सोसायटीत अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांचे वास्तव्य आहे. येथील बहुतेक घरे माथाडी कामगारांना देण्यात आली आहेत. निकृष्ट दर्जाच्या बांधकामांमुळे या घरांची अवस्था दयनीय झाली आहे. पावसाळ्यात या सोसायटीमधील बहुतेक घरांना गळती लागते. छताचे प्लास्टर पडल्याच्या अनेक घटनाही घडल्या आहेत. इमारती पूर्णपणे धोकादायक झाल्या असल्या तरी त्यांच्या पुनर्विकासात राजकीय वादामुळे विघ्न निर्माण झाले आहे. त्यामुळे धोकादायक इमारतींचा पुनर्विकास रखडला असल्याने सिम्प्लेक्समधील माथाडी कामगारांच्या गृहिणी आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढून अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांना घेराव घातला. आमच्या इमारतींचा पुनर्विकास तातडीने मार्गी लावण्यात यावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
…तर थेट आझाद मैदानात आंदोलन करणार
आमची घरे ही फक्त १८० चौरस फुटांची आहेत. आता कुटुंबाचा विस्तार झाल्यामुळे इतक्या लहान घरात वास्तव्य करणे अवघड झाले आहे. या सोसायटीत मलनिस्सारण वाहिनीची दयनीय अवस्था झाली असल्याने अनेक घरांतील भिंती नेहमीच ओलसर असतात. त्यामुळे आमचे आरोग्य धोक्यात आले आहे. जर महापालिका प्रशासनाने मोर्चाची दखल घेतली नाही तर थेट आझाद मैदानात आंदोलन छेडण्याचा इशारा या महिलांनी दिला आहे.


























































