
मुंबईतील वाढता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेन या अंतर्गत नव्या कडक निर्बंधाची घोषणा केली. यात सामान्य नागरिकांसह अनेकांना लोकल प्रवासासाठी मनाई करण्यात आली असून यातून माथाडी कामगारांना वगळावे, अशी मागणी शिवसेना प्रणित हिंदुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार सेनेतर्फे करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून ही मागणी करण्यात आली असून नुकतीच या निवेदनाची एक प्रत भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत यांच्याकडे संघटनेचे अध्यक्ष विकास मयेकर यांनी सुपूर्द केली.
माथाडी कामगारांना लोकल प्रवासासाठी मुभा देण्यात आलेली नाही. त्यामुळे जीवनाश्यक मालाच्या वितरणाची साखळी सुरळीत राहण्यासाठी माथाडी कामगारांची सेवा ही अत्यावश्यक बाब असल्याने त्यांना देखील लोकल प्रवासाची मुभा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
विविध बाजारपेठांमध्ये जीवनावश्यक मालाची चढउतार करणारे माथाडी कामगार हे असंघटित असून मुंबईत विविध भागांत वास्तव्याला आहेत. कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी लोकल रेल्वे हा एकमेव पर्याय आहे.
सकाळी 6 ते 12 वाजेपर्यंतच ओळखपत्रावरच लोकल प्रवासाची मुभा देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

























































