पाच कोटींच्या ठेवींचा गैरव्यवहार करणाऱ्या दोघांना अटक,बनावट लेटरहेडचा केला वापर

300

माथाडी कामगारांच्या बँकेत ठेवलेल्या 5 कोटी रुपयांच्या ठेवीचा अपहार करणाऱ्या दोघांना साकीनाका पोलिसांनी अटक केली. त्रिभुवनसिंग रघुनाथ यादव आणि मुबारक पटेल अशी त्या दोघांची नावे आहेत. ते दोघे सध्या पोलीस कोठडीत आहेत.

कापड बाजार आणि दुकान मंडळ हे माथाडी कामगारांच्या पगाराचे नियोजन करतात. तसेच लेव्हीच्या रकमा राष्ट्रीयीकृत बँकेत ठेवल्या जातात. गेल्या वर्षी मंडळाने पाच कोटी रुपयांच्या ठेवी साकीनाका येथील इंडियन ओव्हरसीस बँकेत ठेवल्या होत्या. मुदत ठेवीवर बँक 6.75 टक्के व्याजदर देत होती. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात त्या ठेवींची मुदत संपणार होती. मात्र एका महिन्याने व्याज दर योग्य नसल्याचे कारण पुढे करून त्या ठेवी काढून घेतल्या गेल्या. त्या ठेवी भांडुप येथील विजया बँकेत बनावट खाते उघडून तेथे वळत्या करण्यात आल्या.

ऑक्टोबर महिन्यात मंडळाने त्या ठेवींबाबत बँकेत जाऊन चौकशी केली. तेव्हा फसवणुकीचा प्रकार समोर आला. मंडळाचे अध्यक्ष दिनेश दाभाडे यांनी साकीनाका पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. परिमंडळ 10चे पोलीस उपायुक्त अंकित गोयल, सहायक पोलीस आयुक्त मिलिंद खेतले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक किशोर सावंत, पोलीस निरीक्षक बुधन सावंत, पाडवी, ढवण, जागडे यांच्या पथकाने तपास सुरू केला. ते पैसे नेमके कोणत्या बँक खात्यात जमा केले गेले याची माहिती पोलिसांनी काढली. त्यावरून बँकेचा मॅनेजर त्रिभुवनसिंगचा सहभाग उघड झाला. त्याला पोलिसांनी अटक केली. त्रिभुवनच्या चौकशीत मुबारक पटेलचे नाव समोर आले. त्याला एका गुह्यात पटेलला पोलिसांनी अटक केली असून तो ठाणे तुरुंगात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याला या गुह्यात तपासाकरता पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.

बँक खात्याचा शोध सुरू

5 कोटींच्या ठेवी या ऑनलाइन तसेच विविध प्रकारे वळत्या केल्या होत्या. पैसे नेमक्या कोणत्या खात्यात वळते झाले होते याचा शोध पोलीस घेत आहेत. तर बनावट लेटर बनवून देण्यास मुबारकला कोणी मदत केली याचाही शोध घेतला जाणार आहे. मुबारकने डॉक्टरकी सोडल्यानंतर तो त्रिभुवनच्या संपर्कात आला होता.

आपली प्रतिक्रिया द्या