
सामना प्रतिनिधी । मुंबई
थंड हवेचे ठिकाण असलेले माथेरानची राणी लवकरच आठ डब्यांच्या संगतीने धावणार आहे. सध्या सहा डब्यांच्या असलेल्या या ट्रेनची आठ डब्यांची ट्रायल यशस्वी झाली आहे.
या आठ डब्यांना रिसर्च, डिझाईन ऍण्ड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन ‘आरडीएसओ’ कडून नुकताच हिरवा कंदील मिळाला असून रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या मंजूरीची केवळ प्रतिक्षा असून त्यानंतर आठ डब्यांची मिनी ट्रेन चालविणे शक्य असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. माथेरानच्या राणीला सहा डब्बे असून त्यात 3 सेकंड क्लास, 1 फर्स्ट क्लास, 1 फॅमिली कोच व 1 लगेज कोच असे डब्यांचे स्वरूप आहे. फर्स्ट क्लासमध्ये 24 आसने असून सेकंड क्लासमध्ये 30 आसने आहेत.
मध्य रेल्वे या मिनीट्रेनला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मानांकन मिळावे याच्या प्रयत्नात आहे. या गाडीला वातानुकूलित डबा आणि वाफेचे पुरातन इंजिन जोडून त्याची सैर परदेशी नागरिकांना घडविण्यासाठी आयआरसीटीसीद्वारे त्याचे बुकींग सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे.

































































