Yamuna Expressway – यमुना एक्सप्रेसवेवरील अपघातात बस -कार जळून खाक; पाच जणांचा मृत्यू

मथुरेतील महावन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यमुना एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाला आहे. येथे एक डबल डेकर स्लीपर बस दुभाजकाला धडकली. यानंतर मागून येणाऱ्या भरदाव कारने बसला धडक दिली. त्यामुळे दोन्ही वाहनांनी जागीच पेट घेतला. या घटनेत कारमध्ये प्रवास करणाऱ्या पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात मथुरेतील महावन पोलीस स्टेशन हद्दीतील माईलस्टोन 117 जवळ घडला. स्लीपर बस आग्राहून नोएडाला जात होती. यावेळी बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दुभाजकाला धडकली. दरम्यान, मागून येणाऱ्या भरदाव कारचीही बसला धडक बसली. या धडकेने बसच्या डिझेल टाकीला आग लागली. या आगीत कारही जळून खाक झाली. डबल डेकर बसमध्ये सुमारे 50 प्रवासी होते. यातील काही प्रवासी जखमी झाले आहेत. तर कारमध्ये प्रवास करणाऱ्या पाच जणांचा मृत्यू झाला. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. अपघाताची माहिती घेत असताना एसएसपी म्हणाले की, महावन पोलीस स्टेशनच्या आग्रा-नोएडा ट्रॅकवर माईलस्टोन 117 जवळ आज सकाळी हा अपघात झाला. यामध्ये पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सध्या मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. आमच्या संपूर्ण टीम कडून पुढील तपास सुरु आहे असे ते म्हणाले.