
अमेरिकेतील हवाई येथील माउईच्या जंगलामध्ये लागलेल्या भीषण वणव्यामध्ये आतापर्यंत 89 जणांचा मृत्यू झाला आहे. यात मोठ्या प्रमाणात वित्तहानीही झाली आहे. जवळपास 2100 एकरवरील झाडं आणि 2200हून अधिक घरं, गाड्या यात जळून खाक झाली आहेत. गेल्या 100 वर्षातील ही सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
हवाईच्या जंगलामध्ये काही दिवसांपासून आग भडकली आहे. आगीने संपूर्ण जंगल कवेत घेतले असून चक्रिवादळामुळे ही आग सर्वत्र पसरत आहे. या आगीत हवाईसह लाहैना शहरातील ऐतिहासिक वास्तुंचेही नुकसान झाले. घरंची घरं आगीच्या ज्वाळांनी वेढली जात असून लोकांनी जीव वाचवण्यासाठी नदीत, समुद्रात उड्या घ्याव्या लागत आहेत.
अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आग आणि धूर यामुळे यात अडकलेल्या लोकांचा जीव वाचवणे कठीण होत आहे. यात आतापर्यंत 89 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती राज्यपाल जोश ग्रिन यांनी व्यक्त केली आहे.
आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर आमचा पहिला प्रयत्न लोकांना पुन्हा घरं मिळवून देणे, त्यांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा देणे याकडे असल्याचे राज्यपाल जोश ग्रिन म्हणाले. आगीमुळे या भागातील जनजीवनही विस्कळीत झाले असून ते सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शेकडो लोक अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू असल्याचेही ग्रिन म्हणाले
दरम्यान, गेल्या 100 वर्षातील हवाईतील ही सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती आहे. याआधी 1960मध्ये आलेल्या त्सुनामीमध्ये 61 लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच कॅलिफरोनियाच्या पॅराडाईज शहरात 2018मध्ये लागलेल्या आगीत 85 जणांचा मृत्यू झाला होता. हा आकडाही आता मागे पडला आहे.




























































