
कोस्टल रोडच्या कामात असणारे दोन महाबोगदे तयार करण्यासाठी महाकाय ‘मावळा’ टनेल बोअरिंग मशिनचे काम नव्या वर्षात जानेवारी सुरू होणार असून 18 महिन्यांत पूर्ण होणार आहे. जमिनीपासून 10 ते 70 मीटर खाली आणि देशातील सर्वात मोठय़ा टनेल बोअरिंग मशिनने खोदण्यात येणारा हा सर्वात मोठा बोगदा ठरणार असल्याचे सागरी किनारा रस्त्याचे प्रमुख अभियंता विजय निघोट यांनी सांगितले.
कोस्टल रोडचे काम आतापर्यंत 20 टक्के पूर्ण झाले आहे. डिसेंबर 2021 पर्यंत 55 टक्के, डिसेंबर 2022 पर्यंत 85 टक्के व जुलै 2023 पर्यंत 100 टक्के काम पूर्ण होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, जमिनीखालील बोगद्यांमध्ये एकूण 6 लेन असणार आहेत. हा बोगदा विशिष्ट पद्धतीने तयार करण्यात येत असून बोगद्यात काही दुर्घटना घडल्यास स्काडा पद्धतीमुळे पालिका आपत्कालीन नियंत्रण कक्ष, मुंबई अग्निशमन दल, पोलीस व वाहतूक पोलीस या यंत्रणेने तत्काळ मेसेज जाणार असून तातडीने मदत करणे शक्य होणार आहे.
वरळी सी-लिंकपासून पुढे कांदिवलीपर्यंत हा रस्ता जाणार आहे. यामुळे मुंबईकरांचा वेळ वाचेल, प्रदूषण कमी होईल आणि पर्यावरण संवर्धन होण्यास मदत होणार असल्याचे विजय निघोट यांनी सांगितले.
असे सुरू आहे काम
कोस्टल रोड तीन पॅकेजमध्ये विभागण्यात आला आहे. पॅकेज चारमध्ये प्रिन्सेस स्ट्रिट फ्लायओव्हर ते प्रियदर्शिनी पार्क 4.05 किलोमीटर, पॅकेज एकमध्ये प्रियदर्शिनी पार्क ते बडोदा पॅलेस 3.32 किलोमीटर आणि पॅकेज दोनमध्ये बडोदा पॅलेस ते वांद्रे वरळी सी लिंक 2.71 किलोमीटरचा रस्ता बांधला जाणार आहे. पॅकेज 1 व 4 साठी लार्सन अँड टुब्रो तर पॅकेज 2 चे काम एचसीसी – एचडीसी यांना कंत्राट देण्यात आले आहे.
कोस्टल रोडवर 2.082 किलोमीटरचे दोन बोगदे असणार आहेत. हे बोगदे खोदण्यासाठी चायना मेड टीबीएम (बोगदा खोदण्याचे मशीन) वापरले जाणार आहे. या मशीनला ‘मावळा’ असे मराठमोळे नाव देण्यात आले आहे. या मशीनचा व्यास 12.19 मीटर आहे.
बोगद्याच्या अंतर्गत व्यास 11 मीटर असणार आहे. कोस्टल रोडवर जाण्यासाठी अमरसन्स गार्डन येथे 4 ठिकाणी, हाजी अली येथे 8 ठिकाणी, वरळी येथे 6 ठिकाणी इंटरचेंज म्हणजेच वळण रस्ते ठेवण्यात येणार असून ते रस्ते मुंबईतील रस्त्यांना जोडले जाणार आहेत.
1800 पार्किंग मिळणार
अमरसन्स गार्डन येथे 200 वाहने
हाजी अली येथे 1,200 वाहने
वरळी येथे दोन ठिकाणी 400 वाहन पार्किंग व्यवस्था
वरळी येथे बीआरटीएस बस डेपो
























































