
पालिकेच्या वैधानिक सभांसह इतर बैठका ऑनलाइन न घेता प्रत्यक्ष घेण्यासाठी परवानगी मिळण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा यासाठी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालिका आयुक्त यांना पत्र दिले आहे. यासंदर्भात आवश्यक कार्यवाही तातडीने करावी असे निर्देश यातून देण्यात आले आहेत.
मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यापासूनच राज्य सरकारच्या निर्देशानुसार पालिकेच्या बैठका ऑनलाइन पद्धतीने होत आहेत. मात्र कोरोनाची पहिली लाट नियंत्रणात आल्यानंतर या बैठका कोरोना खबरदारी नियमावली पाळून सुरू करण्यातही आल्या. मात्र काही दिवसांतच कोरोनाची दुसरी मोठी लाट आल्याने पुन्हा ऑनलाइन पद्धतीनेच बैठका घेणे सुरू करण्यात आले. मात्र सद्यस्थितीत कोरोनाची दुसरी लाट पूर्ण नियंत्रणात आली आहे. त्यामुळे शिवसेनेसह सर्वपक्षीय नगरसेवकांकडून सर्व बैठका सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत घ्याव्यात अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे आयुक्तांना आवश्यक कार्यवाही करण्यासाठी पत्र दिल्याचे महापौरांनी सांगितले. दरम्यान, प्रशासनाच्या निर्देशानुसार बैठका घेतल्या जात असताना भाजप नाहक राजकारण करीत असल्याचेही त्या म्हणाल्या.
15 दिवसांत खड्डे बुजवण्याची कार्यवाही करा
मुंबईत रस्त्यांवर निर्माण झालेले खड्डे बुजवण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याचे यावेळी महापौर म्हणाल्या. याबाबत संबंधित अधिकाऱयांची बैठक घेऊन कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याचेही त्या म्हणाल्या. त्यामुळे येत्या 15 दिवसांत खड्डे बुजवण्याचे काम वेगाने होईल आणि मुंबईकर वाहनचालकांना दिलासा मिळेल असेही त्यांनी स्पष्ट केले. वाहतुकीला फटका बसू नये म्हणून खड्डे बुजवण्याचे काम शक्यतो रात्री करावे आणि बेजबाबदार पंत्राटदारांवर कारवाई करावी असे निर्देशही दिल्याचे महापौरांनी सांगितले.

























































