
कोरोनाच्या संसर्गामुळे देश संकटात असतांना मी महापौर असले तरी माझ्यातील परिचारिका स्वस्थ बसू शकत नाही. त्यामुळे रुग्णसेवा करण्यासाठी मला अनुमती द्यावी अशी विनंती कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर विनीता राणे यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे. महापौरानी दाखवलेल्या सामाजिक दायित्वतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
महापौर विनीता राणे यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी याना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळीच खबरदारी घेऊन कठोर उपाययोजना केल्या आहेत. कोरोनाचा फैलाव वाढू नये यासाठी सर्वांनीच योगदान देण्याची गरज आहे. यापार्श्वभूमीवर मी कल्याण डोंबिवली महापालिकेची महापौर असले तरी नायर रुग्णालयात ३२ वर्षे परिचारिका म्हणून सेवा केली आहे. त्यामुळे देश संकटात असतांना मी स्वस्थ बसू शकत नाही. मी कल्याण डोंबिवली पालिका रुग्णालयात रुग्णसेवा देण्यास तयार असून मला अनुमती मिळावी अशी विनंती त्यांनी आयुक्तांकडे केली आहे. विनीता राणे यांनी सामाजिक भान जपत रुग्णसेवा करण्याची दाखवलेली तयारी सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे.



























































