मुंबईतील क्रिकेट सुरू करण्यासाठी एमसीएचे प्रयत्न; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे निवेदन

मुंबईतील क्रिकेट सुरू करण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून (एमसीए) पाऊल उचलण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एमसीएकडून पत्राद्वारे याबाबत निवेदन करण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकार यांच्याकडून तयार करण्यात आलेल्या नियमांनुसार मुंबईतील मैदानी क्रिकेट सुरू होईल असे आश्वासनही याप्रसंगी एमसीएकडून देण्यात आले आहे.

मुंबईसह ठाणे, पालघर, नवी मुंबई व रायगडमधील क्रिकेट एमसीएच्या अधिपत्याखाली पार पडते. कोरोनामुळे मार्च महिन्यापासून मुंबईसह महाराष्ट्रातही लॉकडाऊन करण्यात आले आहे. एप्रिल व मे महिना खरेतर क्रिकेट शिबिरांचा म्हणून ओळखला जातो. असंख्य युवा खेळाडू या दोन महिन्यांमध्ये सर्वस्व पणाला लावून कसून सराव करीत असतात. पण कोरोनामुळे या वर्षी कोणत्याही ठिकाणी क्रिकेट शिबिराचे आयोजन करण्यात आले नाही. त्यामुळे युवा खेळाडूंचे प्रचंड नुकसान झाले आहे.

सांघिक खेळ असल्यामुळे अडचण

एमसीएकडून क्रिकेट सुरू होण्यासाठी पाऊल उचलण्यात आले असले तरी लवकरात लवकर क्रिकेट सुरू होईल अशी शक्यता दिसत नाही. कारण सध्या तरी वैयक्तिक पातळीकर खेळाडूंच्या सरावाला परवानगी देण्यात आली आहे. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. त्यामुळे या खेळाला सरसकट परवानगी देणे सध्या तरी शक्य दिसत नाही. सरकारकडून काही नियम व अटी लावण्यात आल्यानंतर हा खेळ काही प्रमाणात सुरू होऊ शकतो.

आंतर राज्य स्पर्धेसाठी रेडी

बीसीसीआयने गेल्या आठवडय़ात संलग्न संस्थांना स्थानिक क्रिकेट सुरू करण्यासाठी नियमावली बनवण्याचे सांगितले आहे. सुरूवातीला आंतर राज्य क्रिकेट स्पर्धा खेळवण्यासाठी प्रयत्न करायला हवा असे बीसीसीआयला वाटते. पण महाराष्ट्र सरकारकडून परवानगी मिळाल्याशिवाय या सर्व बाबी होऊ शकत नाहीत. त्यामुळे एमसीएकडून पत्राद्वारे हे पाऊल उचलण्यात आले आहे.

क्युरेटर, प्रशिक्षकही संकटात

गेल्या तीन महिन्यांत क्रिकेट झाले नसल्यामुळे असंख्य क्युरेटर व स्थनिक प्रशिक्षकांनाही संकटाचा सामना करावा लागत आहे. क्युरेटर व प्रशिक्षक सध्या घरी बसून आहेत. त्यांच्या आर्थिक परिस्थितीवरही परिणाम होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर क्रिकेट सुरू व्हावे यासाठी एमसीए प्रयत्न करीत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या