भाजप आमदाराची सफाई कामगाराला मारहाण, ‘आप’ने शेअर केला व्हिडिओ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतीय जनता पक्षाचे आमदार अभय वर्मा यांनी दिल्ली महानगरपालिकेतील सफाई कामगाराला मारहाण केल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे आमदार कुलदीप कुमार यांनी केला आहे. अभय वर्मा यांनी सफाई कामगाराच्या कानशिलात लागवल्याचा आरोप ‘आप’ने केला आहे. या घटनेचा व्हिडिओ आपचे आमदार कुलदीप कुमार यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. यात भाजप आमदार एका व्यक्तीला कानाखाली मारत शिवीगाळ करत असल्याचे दिसत आहे.

व्हिडिओ शेअर करत आमदार कुलदीप कुमार यांनी ट्विट केले की, ‘भाजप द्वेषाचे राजकारण करत आहे. लक्ष्मीनगरचे आमदार अभय वर्मा यांनी दिल्ली महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केले. भाजपच्या या गुंडगिरीविरोधात आता सर्वांनी एकत्र यायला हवे. भाजपने दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीतील पराभवाचा राग सफाई कर्मचाऱ्यांवर काढला. त्यामुळे दलित समाजात संतापाचे वातावरण आहे. असे ते म्हणाले.

लक्ष्मी नगरचे आमदार अभय वर्मा यांनी पालिकेच्या सफाई कामगाराला सार्वजनिक शौचालयाला लागून असलेल्या खोलीची चावी मागितली मात्र हा सफाई कामगार खोलीची चावी देऊ शकला नाही. याचा राग आल्याने भाजप आमदाराने कामगाराच्या कानाखाली मारली आणि शिवीगाळही केली. हा व्हिडिओ व्हायरल होताच ‘आप’ने भाजपवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे.

‘भाजप आमदार अभय वर्मा यांनी सफाई कामगाराला शिवीगाळ करून दलित समाजाच्या बहिणी आणि मुलींचा अपमान केला आहे. याविरोधात आपच्या वतीने आयुक्तांना पत्र लिहून गुन्हा दाखल केला जाणार आहे. तसेच भाजप आमदाराच्या घराबाहेर आंदोलन केले जाणार असल्याचे आप नेत्या राखी बिर्ला यांनी सांगितले.

या प्रकरणी एका वाहिनीशी बोलताना भाजप आमदार अभय वर्मा म्हणाले की, मी स्वच्छता कर्मचाऱ्यांना वारंवार शौचालय उघडण्यास सांगत होतो. शौचालय वापरण्यासाठी पैसे मोजावे लागत असल्याचा आरोप तेथील लोकं करत होते. मी शौचालय उघडले असता तो कर्मचारी माझ्याशी असभ्य वागला.