माहिती मिळवा, तक्रारी सोडवा झटक्यात, मुंबईकरांसाठी पालिकेचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म

361
bmc-2

पालिकेच्या सर्व विभागांची माहिती एका क्लिकवर मिळावी, नागरिकांना आपल्या तक्रारी मांडता याव्यात आणि समस्या-तक्रारी लवकरात लवकर सोडवल्या जाव्यात यासाठी पालिका केंद्रीय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरू करणार आहे. या ठिकाणी मुंबईकरांना पालिकेच्या विभाग कार्यालयांची माहिती, अपडेट आणि कार्यक्रम नागरिकांना समजू शकणार आहेत. पालिकेच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला आज स्थायी समितीत मंजुरी मिळाली.

मुंबईकरांना विविध प्रकारच्या सेवा ऑनलाइन देता याव्यात यासाठी पालिकेने MCGM 24X7 मोबाईल ऑप्लिकेशन विकसित केले आहे. या माध्यमातून नागरिकांना पाणीपट्टी, मालमत्ता कर, लॉग तक्रारी, शौचालय शोधक आणि आपत्ती, इव्हेंट हायलाइटस् आणि संदेश देण्याची सुविधा उपलब्ध आहे. शिवाय पालिकेच्या www.portal.mcgm.gov.in या वेब पोर्टलवरून नागरिकांना विभाग कार्यालयांचा तपशील, दिल्या जाणाऱया नागरी सेवा-सुविधाही पुरवल्या जातात. या कामात आणखी सुसूत्रता आणून गतिमान सेवा देण्यासाठी केंद्रीय सोशल मीडिया प्लॅटफार्म विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

असा राबवणार प्रकल्प
– फेसबुक आणि ट्किटरच्या माध्यमातून विविध विभाग कार्यालयांची माहिती, अपडेटस् आणि कार्यक्रम नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेने सोशल मीडिया प्लॅटफार्म तयार करण्यात आला आहे.

– या पार्श्वभूमीवर माहिती तंत्रज्ञान सल्लागार मेसर्स केपीएमजी यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार महाआयटी यांच्यामार्फत 35 आयटी ऑफिस सहायक व सोशल मीडियातज्ञ आदी मनुष्यबळ सेवा घेण्यासाठी 27 जून 2019मध्ये करार केला आहे.

 – यानुसार 16 जुलै 2019 ते 15 जुलै 2022 पर्यंत ही मनुष्यबळाची सेवा घेऊन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची देखभाल केली जाणार आहे. यासाठी 5 कोटी 79 लाख 94 हजार रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या