
काही दिवसांपूर्वी पनवेल येथे कोटय़वधी रुपये किमतीचा एमडी साठा व रोकड जप्त केल्या प्रकरणात ‘एटीएस’ने शुक्रवारी आणखी एक कारवाई केली. पनवेल येथील लॅबमध्ये बनवलेला एमडी घेऊन तो स्थानिक पेडलर्सना वितरित करणाऱया तन्वीर अब्दुल अजीज पिर्याणी ऊर्फ तरकारी याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.
एटीएसच्या विक्रोळी युनिटने पनवेल येथील एका कंपनीवर छापा टाकून कोटय़वधी किमतीचा एमडी साठा जप्त केला होता. त्यावेळी पाचजणांना अटक केली होती. याच प्रकरणात सांगलीतील सरदार पाटील या उच्चशिक्षित तरुणाचादेखील हात असल्याचे निष्पन्न होताच त्यालाही अटक करण्यात आली. मग हा एमडी साठा स्थानिक पातळीवर वितरित करणाऱया दोघांच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी पायधुनी येथून तन्वीर तरकारी याला अटक करण्यात आली. तन्वीर हादेखील ड्रग्जमाफिया असून तो खबऱयाचेदेखील काम करायचा असे पोलीस सूत्रांकडून समजते.




























































