
दक्षिण मुंबईतील नशेबाजांना एमडी विकण्यासाठी गोवंडीवरून आलेल्या ड्रग्ज तस्कराला अमली पदार्थविरोधी पथकाच्या आझाद मैदान युनिटने रंगेहाथ पकडले. त्या तस्कराकडून 10 लाख रुपये किमतीचा 200 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आला.
विकास ठाकूर असे अटक ड्रग्ज तस्कराचे नाव असून तो पूर्व उपनगरात ड्रग्जची तस्करी करतो. तसेच तो बबलू पटरी या कुप्रसिद्ध ड्रग्जमाफियाचा साथीदार आहे. विकास एमडीचा साठा विकण्यासाठी फोर्ट परिसरात येणार असल्याची खबर आझाद मैदान युनिटला मिळाली. त्यानुसार प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील जाधव, एपीआय कदम, मोरे, अंमलदार भालेराव, मोरे या पथकाने फोर्ट परिसरात सापळा रचून तेथे एमडीचा साठा घेऊन आलेल्या विकासवर झडप घातली.
एमडी प्रकरणात एटीएसने सहाव्या आरोपीला पकडले नवी मुंबई येथील गोदामात छापा मारून कोटय़वधीचा एमडी साठा व पाच ड्रग्ज तस्करांना पकडल्यानंतर एटीएसने याप्रकरणात सांगलीतून एकाला पकडले. तसेच वांद्रे येथील झोपडपट्टी परिसरात असलेल्या एका सार्वजनिक शौचालयातून 2.6 किलो एमडी साठा जप्त केला. अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीत सांगलीत राहणारा सरदार पाटील (28) याचे नाव समोर आले. त्यानुसार पोलिसांनी केमिस्ट्रीमधून पदवी घेतलेल्या सरदारला अटक केली.




























































