मी टाइम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> स्नेहा चव्हाण

रोज शक्य नसले तरी आठवडय़ातून किमान एक दिवस तरी स्वतःसाठी वेळ द्यायला पाहिजे. त्यालाच आजच्या भाषेत ‘मी टाइम’ म्हणतात. स्वतःसाठी वेळ द्या.

स्त्री-पुरुषाच्या सहयोगातून हे जग चालले आहे. पुरुषांनी बाहेरची कामे करावीत आणि स्त्र्ायांनी घर सांभाळावे अशी विभागणी पूर्वी होती, पण काळ बदलला आणि स्त्रीया घराबाहेर पडायला लागल्या. शिक्षण घेऊन नोकरी करायला लागल्या आणि आता तर त्या सगळ्याच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत आहेत ही चांगली बाब असली तरी स्वतःसाठी काही वेळ राखून ठेवणे महत्त्वाचे असते. याला म्हणतात ‘मी टाइम’ फक्त स्वतःसाठी राखून ठेवलेला वेळ. मग तो सकाळचा, दुपारचा, सायंकाळचा किंवा रात्रीचा असू शकतो. या वेळेत आपण आपले छंद, कला जोपासणे किंवा काही नवे शिकणे अपेक्षित आहे; पण प्रत्यक्षात फार थोडय़ा महिला ‘मी टाइम’साठी वेळ काढू शकतात. घर आणि बाहेरच्या जबाबदाऱया पार पाडण्यात त्या एवढय़ा गुंतलेल्या असतात की, वेळ उरत नाही. आरोग्यासाठी हे चांगले नाही. एखादे यंत्र न थांबविता सलग चालवत राहिलात तर त्याच्या भागांची झीज व्हायला लागून यंत्राची कार्यक्षमता घटायला लागते. हेच माणसालाही लागू होते. सलग काम आणि जबाबदारीत गुंतून राहण्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम व्हायला लागतो. सध्याच्या काळात स्वतःसाठी कोणाकडे वेळ नसतो आणि महिलांबाबत ते प्रकर्षाने जाणवते. घर, मुले आणि इतर कामांत त्या एवढय़ा अडकतात की, आपल्यालाही काही वैयक्तिक आयुष्य असल्याचे त्या विसरून जातात. त्यातच त्या नोकरदार असतील तर तेथील तणावही येतात. त्यामुळे रोज शक्य नसले तरी आठवडय़ातून किमान एक दिवस तरी स्वतःसाठी वेळ द्यायला पाहिजे. त्यालाच आजच्या भाषेत ‘मी टाइम’ म्हणतात. स्वतःसाठी वेळ द्या. कारण आपण आहोत तर जग आहे.

हा वेळ तुमचा, तुमच्यासाठी आहे
घरातील जबाबदाऱया आजही प्रामुख्याने महिला पेलतात; पण तुम्ही घरात एकटय़ा आहात आणि छान जमलेल्या चहाचे घोट घेताना तुम्ही तुमच्या आवडीचे एखादे गाणे कधी गुणगुणले हे जरा आठवा. त्या वेळी तुम्हाला नक्कीच प्रसन्नता लाभली असेल. स्वतःबरोबर एकटेपणाने काढलेल्या अशा वेळेलाच ‘मी टाइम’ म्हणतात. याचा संबंध ‘सेल्फ लव्ह’ या संज्ञेबरोबरही जोडता येतो. म्हणजे आपली काळजी घेणे.

तुम्ही आहात वेगळ्या आणि विशेष
आपल्या कुटुंबीयांचा आनंद म्हणजे आपले सुख असल्यामुळे आपल्यासाठी वेगळे काही करण्याची गरज नसल्याचे बहुसंख्य स्त्र्ायांना वाटते. आपण गृहिणी आहोत म्हणजे आपल्यात काहीतरी कमतरता असल्यामुळे ‘मी टाइम’चा त्या विचारही करत नाहीत; पण ही समजूत चुकीची आहे. तुम्ही स्वतःची काळजी घेतलीत, तर तुम्ही शारीरिक-मानसिकदृष्टय़ा निरोगी, आनंदी राहाल आणि जास्त कार्यक्षमतेने कुटुंबीयांची काळजी घेऊ शकाल हे लक्षात घ्या. ‘मी टाइम’साठी तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनचर्येत थोडा बदल करावा लागेल आणि कुटुंबीयांनासुद्धा त्याची सवय करून घ्यावी लागेल. तुम्हालाही तुमचा वेळ हवा असणे ही तुमची गरज असल्याचे कुटुंबीयांनी समजून घेतले पाहिजे. हे करणे अशक्य मुळीच नाही.

त्यासाठी खालील काही बाबी लक्षात ठेवा.
‘मी टाइम’ म्हणजे जादूचा प्रयोग नाही. तो आपोआप निर्माण होणार नाही. त्यासाठी तुम्हालाच वेळ काढायला हवा.
आपल्या आवडी, छंदांची यादी करून ठेवल्यास ‘मी टाइम’च्या काळात त्यांची पूर्तता करता येईल.
काही वेळा काही न करता ब्युटी पार्लरमध्ये जाऊन स्वतःचे सौंदर्य खुलविणेसुद्धा ‘मी टाइम’मध्ये येते. आपण आकर्षक दिसावेसे वाटण्यात गैर काही नाही. आपल्या खासगी वेळेचा पुरेपूर आनंद घ्या.
‘मी टाइम’ तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे याची कुटुंबीयांना कल्पना द्या.

(लेखिका श्रमिक विद्यालय, जोगेश्वरी (पूर्व) येथे सहशिक्षिका आहेत. तसेच करीअर समुपदेशक आहेत.)