अबब! अंगठीत जडवले 12683 हिरे, गिनीज बुकमध्ये झाली नोंद

काही काळापूर्वी हैदराबादच्या एका सराफाने अंगठीत 7901 इतके हिरे जडवण्याचा विक्रम केला होता. मात्र, काही महिन्यांतच हा विक्रम मोडला असून त्या जागी नवीन विक्रम प्रस्थापित झाला आहे. मेरठ येथील हिरे व्यापाऱ्याने तब्बल 12 हजार 683 हिरे एका अंगठीत जडवले आहेत.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मेरठच्या हर्षित बंसल नावाच्या व्यापाऱ्याने झेंडूच्या फुलाच्या आकाराची अंगठी बनवून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. 25 वर्षांचा हा तरुण उच्चशिक्षित असून सूरत येथे दागिने डिझाईन करण्याची कला शिकला आहे. 2018मध्ये त्याच्या वाचनात 6690 इतके हिरे जडवलेल्या अंगठीविषयीची माहिती आली होती. हर्षित यालाही अशीच अंगठी घडवण्याची इच्छा होती.

त्याने त्या दरम्यान मेरठ येथे आपलं दागिन्यांचं दुकान उघडलं आणि या अंगठीवर काम करायला सुरुवात केली. या अंगठीचा डिझाईन झेंडूच्या फुलाप्रमाणे आहे. हे डिझाईन निवडण्यापूर्वी त्याने अनेक डिझाईनचा विचार केला. पण अचानक त्याला बागेत दिसलेल्या झेंडूमुळे ही कल्पना सुचली आणि त्याने झेंडुचं डिझाईनच निवडलं.

अंगठीचं वैशिष्ट्य

या अंगठीची प्रत्येक पाकळी वेगळी असून त्यात त्यानुसार हिरे जडवले गेले आहेत. अतिशय उच्च दर्जाचे आणि प्रमाणित हिरे यात जडवण्यात आले आहे. विशेष म्हणजे ही अंगठी परिधानही करता येऊ शकते. या अंगठीत जडवलेला प्रत्येक हिरा हा आंतरराष्ट्रीय रत्नपरीक्षणात पास झाला आहे.

अंगठीची किंमत

या अंगठीची नोंद गिनीज बुकमध्ये झाली आहे. कारण इतके हिरे जडवलेला तो जगातला सर्वात लहान दागिना आहे. या हिऱ्यांची आणि एकूणच अंगठीची किंमत विचारली असता हर्षितने याला विकण्याची इच्छा नसल्याचं सांगितलं. ही अंगठी माझ्यासाठी अमूल्य आहे. त्यामुळे तिची किंमत काढणं किंवा तिला विकणं शक्य होणार नाही, असं हर्षितने स्पष्ट केलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या