
आम्ही वीजेबाबतच्या समस्या मांडायच्या. वीज अधिकाऱ्यांनी खोटी आश्वासने द्यायची, हे नेहमीचेच झाले आहे, असे सांगत नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व शिवसेना नगरसेवकांनी आमदार वैभव नाईक यांच्यासमोर वीज अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांना धारेवर धरले. समस्या समजून घेच वैभव नाईक यांनी समस्या सोडवण्यासाठी 10 दिवसांची डेडलाईन अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांना दिली.
मालवण शहर व तालुक्यातील वीज समस्यांबाबत आमदार वैभव नाईक व अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांच्या उपस्थितीत मालवण वीज वितरण कार्यालयात बैठक झाली. मालवण शहरातील बंद असलेल्या स्ट्रीटलाईट, शहर व तालुक्यातील वारंवार खंडित होणारा व कमी दाबाने होणारा वीज पुरवठा यासह अन्य वीज समस्यांबाबत शिवसेना पदाधिकारी व नागरिकांनी आक्रमक भूमिका मांडली. काही वीज खांब गंजले आहेत. मोडकळीस आलेल्या खाबांना वेल्डिंगने आधार देण्यात आला आहे. वीज खांबावरील साहित्य दोरीच्या साहाय्याने बांधून ठेवण्यात आले आहे. यासह अनेक वीज समस्यांनी मालवणातील नागरिक त्रस्त असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. कार्यालयात अधिकारी, ठेकेदार फोन उचलत नाहीत. वीज वितरणचा कारभार मनमानी पद्धतीने सुरू आहे, असे सांगत नगराध्यक्ष व नगरसेवक पंकज साधये, मंदार केणी, महेंद्र म्हाडगूत, गणेश कुडाळकर, तपस्वी मयेकर यांनी आक्रमक भूमिका घेत अनेक समस्या मांडल्या. देवबाग, तारकर्ली, वायरी या पर्यटननगरीत वीज समस्यांमुळे पर्यटन व्यवसायावर परिणाम होतो. काही घरातील वीज पुरवठा अनेक दिवस बंद राहतो. कर्मचारी उपलब्ध नाहीत, असे सांगत तालुकाप्रमुख हरी खोबरेकर व देवबाग उपसरपंच तमाम फर्नांडीस यांनी समस्या मांडल्या.
मालवण शहरातील स्ट्रीटलाईट चालू बंद करण्यास कर्मचारीच नाही, असे वीज वितरणने सांगत तुम्ही कर्मचारी नेमून स्ट्रीटलाईटची सेवा द्या, अशी सूचना मांडली. मात्र मुख्याधिकाऱ्यांनी आपल्याकडे वीज कर्मचारी सोडा, साधा वायरमनही नाही, अशी कबुली दिली. तर नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी स्ट्रीटलाईट चालू बंद करतेवेळी शॉक लागल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? असे सांगत वीज वितरणने कर्मचारी द्यावेत, अशी भूमिका मांडली. मालवणात ज्याप्रमाणे अनेक वीज कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत, त्याचप्रमाणे जिल्ह्यात 40 टक्के अभियंता तर 80 टक्के वायरमनची पदे रिक्त असून आम्हाला माणसेच मिळत नाहीत.त्यामुळे वीज समस्या वाढत आहे. मेंटन्सस, झाडी कटाई ही कामेही वेळेत पूर्ण होत नाहीत. तुम्ही आयटीआय झालेली माणसे द्या, आम्ही त्यांना कंत्राटी पद्धतीने घेतो, अशा प्रकारे वीज वितरणच्या समस्या अधीक्षक अभियंत्यांनी मांडल्या. चार महिन्यांपूर्वी मालवणातील वीज समस्यांबाबत आमदार नाईकांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी जादा कर्मचारी देतो. वीज समस्या मार्गी लावतो, अशी आश्वासने अधीक्षक अभियंत्यांनी दिली होती. मात्र आमदार नाईक यांनी मागील आश्वासने पूर्ण झाली का, अशी विचारणा केली असता आश्वासन पूर्ण न झाल्याची वस्तुस्थिती समोर आली. यावेळी अधीक्षक अभियंत्यांनी मला काहीवेळ द्या, मी समस्या मार्गी लावतो, असे नवे आश्वासन आमदार नाईक यांना दिले.
या बैठकीला नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगरसेवक पंकज साधये, मंदार केणी, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, महेंद्र म्हाडगूत, संमेश परब, नरेश हुले, स्वप्नील आचरेकर, शानु मेंडीस, तपस्वी मयेकर, पप्पू लुईस, किरण वाळके, पॉली गिरकर यांच्यासह अन्य शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.





























































