
मुंबई-पुणे रेल्वे प्रवास करण्याचा विचार करत असाल तर आधी ही बातमी वाचा. लोणावळा रेल्वे यार्डची पुनर्रचना आणि सिग्नलसंबंधी देखभाल दुरुस्तीसाठी मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबरदरम्यान सकाळी 11.25 ते सायंकाळी 6.25 या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान कर्जत, लोणावळा आणि भिवपुरी स्थानकांवर मेल-एक्सप्रेस थांबवण्यात येणार आहेत. यामुळे 15 मेल-एक्सप्रेसवर परिणाम होणार आहे.
प्री नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामांसाठी लोणावळा-बीव्हीटी यार्ड आणि कल्याण-लोणावळा विभागात हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे 28 आणि 29 नोव्हेंबर रोजी इंद्रायणी आणि इंटरसिटी एक्स्प्रेस 10 ते 25 मिनिटे उशिराने धावतील. 26 आणि 27 नोव्हेंबर रोजी 11.15 ते 6.25 पर्यंत डाउन लाईनवर ब्लॉक राहील. ब्लॉक काळात काही गाड्यांना अतिरिक्त थांबे देण्यात येतील तर काहींना विलंब होणार आहे. या काळात पुणे-लोणावळा उपनगरी गाड्या तळेगाव येथे शॉर्ट टर्मिनेट केल्या जातील.
























































