
सामना ऑनलाईन । मुंबई
मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज सकाळी १०.३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे मेगाहाल होण्याची शक्यता आहे. ब्लॉकदरम्यान रेल्वे विलंबाने धावणार आहेत.
मध्य रेल्वे
मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा जलद मार्गावर सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५पर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे यावेळेत मध्य रेल्वेवर कल्याणहून सुटणाऱ्या सर्व जलद लोकल दिवा ते परळ स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर चालवण्यात येतील. सीएसएमटीहून सुटणाऱ्या सर्व जलद लोकल घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, दिवा स्थानकांत थांबतील. ब्लॉकदरम्यान लोकल २० मिनिटे उशिराने धावतील. मेल, एक्स्प्रेसदेखील सुमारे २० मिनिटे उशिराने धावतील. रत्नागिरी ते दादर पॅसेंजरला आज दिवा स्थानकात अंतिम थांबा देण्यात येईल. दादर ते रत्नागिरी पॅसेंजर दिवा स्थानकाहून सुटेल. या प्रवाशांसाठी दादर स्थानकाहून दुपारी ३.४० वाजता विशेष लोकल सोडण्यात येईल.
हार्बर रेल्वे
हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशीदरम्यान दोन्ही मार्गांवर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसएमटी ते पनवेल, बेलापूर, वाशीपर्यंत सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३९ आणि पनवेल, बेलापूर, वाशी ते सीएसएमटीपर्यंत सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४१ पर्यंत सेवा खंडित राहील. सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेलपर्यंत विशेष लोकल चालवल्या जातील.
पश्चिम रेल्वे
पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकात सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ पर्यंत ब्लॉक आहे. या कालावधीत सर्व धीम्या लोकल जलद मार्गावर चालवण्यात येतील. तर काही फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत.
दिवा स्थानकात सोमवारी विशेष ब्लॉक
मध्य रेल्वेवर दिवा स्थानकात सोमवारी १३ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १ ते सकाळी ६.४०पर्यंत नवीन पादचारी पुलाचा गर्डर उभारण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे मंगळवारी १४ ऑगस्ट रोजी काही फेऱ्या रद्द करण्यात येणार आहे. तसेच पनवेल- दिवा पॅसेंजरही रद्द करण्यात येणार आहे.























































