
जम्मू-कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी रविवारी युवकांना आवाहन केले की त्यांनी असा कोणताही मार्ग स्वीकारू नये जो फक्त त्यांच्या नव्हे, तर त्यांच्या कुटुंबाच्या, जम्मू-कश्मीरच्या आणि संपूर्ण देशाच्या दृष्टीने धोकादायक ठरेल. त्यांनी केंद्र सरकारलाही विचार करण्यास सांगितले की अशी कोणती चूक झाली की ज्यांनी आधी दगड आणि बंदुका उचलल्या, ते आता आत्मघाती हल्लेखोर बनू लागले आहेत.
10 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बाँबस्फोटाचा उल्लेख करताना मुफ्ती म्हणाल्या, “जेव्हा एखादा डॉक्टर म्हणतो की तो मरू इच्छितो, तेव्हा ही गोष्ट आपणा सर्वांसाठी गंभीर आहे.” पक्षाच्या नेत्यांना संबोधित करताना त्या म्हणाल्या, “युवकांना माझी एक विनंती आहे. तुम्हाला तुमचं आयुष्य जगायचं आहे. तुम्हाला काश्मीरसाठी जगायचं आहे. जगणं शिका, मरणं नाही. आम्हाला तुमच्या मृतदेहांची नाही, तुमची गरज आहे.”
मेहबूबा मुफ्ती पुढे म्हणाल्या, “मी असे करणाऱ्या युवकांना पुन्हा सांगू इच्छिते की तुम्ही जे करत आहात ते सर्वार्थाने चुकीचे आहे. हे फक्त तुमच्यासाठीच नाही, तर तुमच्या कुटुंबासाठी, जम्मू-कश्मीरसाठी आणि संपूर्ण देशासाठी धोकादायक आहे. तुम्ही एवढा मोठा धोका पत्करत आहात म्हणजे तुम्ही आपल्या प्रियजनांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहात. शिवाय, अनेक निरपराध लोकांचे प्राणही धोक्यात आहेत. गेल्या काही दिवसांपासून ही गोष्ट मला फार त्रास देत आहे.”
मुफ्ती यांनी केंद्र सरकारला सावध करत म्हटले की डॉक्टरांना आत्मघाती हल्लेखोर कसे बनवले जात आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. त्या म्हणाल्या, “जेव्हा एखादा डॉक्टर म्हणतो की तो मरू इच्छितो, तेव्हा ती आपणा सर्वांसाठी अत्यंत गंभीर बाब असते. जे युवक आधी दगड आणि बंदुका उचलत होते, ते आता आत्मघाती हल्लेखोर बनत आहेत. आपले युवक या टप्प्यावर कसे येऊन पोहोचले?”
त्यांनी पुढे सांगितले, “जे युवक डॉक्टर आणि अभियंते होण्यासाठी तयार होते, ते आता आत्मघातकी हल्ला करण्यासाठी तयार आहेत, ही अत्यंत चिंतेची बाब आहे. त्यामुळे देशातील जनतेने, नेतृत्वाने या गोष्टीवर विचार करणे आवश्यक आहे. आपल्याकडून कुठे चूक झाली? केंद्र सरकारनेही विचार करायला हवा. तुम्ही इथल्या युवकांना वचन दिले होते की त्यांच्या हातातून दगड आणि बंदुका काढून त्यांच्या हातात लॅपटॉप द्याल. पण आज तुम्ही त्याच युवकांना आत्मघाती हल्लेखोर बनवले आहे. तुम्ही जम्मू-कश्मीरला सुरक्षित बनवण्याचे आश्वासन दिले होते, पण तुमच्या धोरणांमुळे तुम्ही दिल्लीलाच असुरक्षित केले आहे असेही मुफ्ती म्हणाल्या.
























































