’35 ए’सोबत छेडछाड कराल तर खाक होऊन जाल, मेहबुबा मुफ्तींचे फुत्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

कश्मीर खोऱ्यात दहशवादी हल्ला रोखण्यासाठी केंद्र सरकारने निमलष्करी दलाचे अतिरिक्त 10 हजार जवान कश्मीर खोऱ्यात तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. अचानक जवानांची संख्या वाढवल्यामुळे कश्मीर खोऱ्यात मात्र संभ्रमाचं वातावरण आहे. याकडे राज्याला विशेष अधिकार देणारं कलम 35 ए हटवण्याचं सरकारचं पाऊल म्हणून पाहिलं जात आहे. या निर्णयाविरोधात जम्मू कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी विरोध दर्शवत धमकी दिली आहे.

कलम ’35 ए’सोबत छेडछाड करणं म्हणजे जिवंत बॉम्बला हात लावण्यासारखं आहे. 35 एसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला तरी तो हातच नाही तर संपूर्ण शरीर जळून खाक होऊन जाल, असे फुत्कार मुफ्ती यांनी काढले आहेत. केंद्र सरकारकडून अचानक जवानांची संख्या वाढवण्यात आल्याने काश्मीर खोऱ्यामध्ये कलम 35एबाबत विविध चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर येथील राजकीय पक्षांनी सरकारला कलम 35 ए ला हात लावू नका असा इशारा दिला आहे.