
बुलढाण्यातील मेहकर तालुक्यात बुधवारी सायंकाळी अंदाजे साडेचारच्या सुमारास वीज कोसळून सोनाटी गावातील एक जण ठार झाला. या दुर्घटनेत चार जण जखमी झाले आहेत. तर उमरा देशमुख येथील देखील एक जण जखमी झाला आहे.
मेहकर तालुक्याला आज सायंकाळी साडेचारच्या दरम्यान मुसळधार पाऊस,सोसाट्याचा वाऱ्याने झोडपून काढले. यावेळी सोनाटी येथील शेतात काम करीत असलेले शिवाजी किसन बदर (वय ६०) यांचा वीज पडल्याने मृत्यू झाला तर अमरदास कटारे, विष्णू किसन गुंजकर,राम वाघमारे व राजू शिरे हे जखमी झाले. या जखमींना तात्काळ मेहकर येथील मल्टि हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तर तालुक्यातील उमरा देशमुख येथे ही रामदास कोंडू शिंदे हे वीज पडून जखमी झाले अशी माहिती तहसीलदार डॉ. संजय गरकल यांनी दिली.
































































