चोक्सीला हिंदुस्थानात आणण्याच्या तयारीला वेग, प्रत्यार्पणाची कागदपत्रे भरून खासगी विमान डोमिनिकाला पाठवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील आरोपी, कुख्यात हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला लवकरच हिंदुस्थानात आणले जाण्याची शक्यता वाढली आहे. हिंदुस्थानने चोक्सीच्या प्रत्यार्पणासंबंधी कागदपत्रांचा ढीग असलेले खासगी विमान डोमिनिकाला पाठवले आहे. एंटिगा-बारबुडाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊन यांनी रविवारी स्थानिक रेडिओ शोमध्ये बोलताना ही माहिती दिली. हिंदुस्थानने मात्र याबाबत अजून कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
ॉ
एंटिगातून गायब झालेल्या मेहुल चोक्सीला डोमिनिकामध्ये अटक करण्यात आली. तेव्हापासून तो तेथील तुरुंगात आहे. हिंदुस्थानने त्याचा वेळीच ताबा मिळवण्यासाठी प्रत्यार्पणाची कागदपत्रे डोमिनिका सरकारकडे पाठवली आहेत. कतार एअरवेजच्या ‘ए 7 सीईई’ या खासगी विमानाने दिल्लीतून 28 मे रोजी दुपारी 3.44 च्या सुमारास उड्डाण घेतले व त्याच दिवशी ते विमान डोमिनिकाच्या डॉगलस-चार्लस् विमानतळावर पोहोचले, असे ‘एंटिगा न्यूज रूम’च्या वृत्तात म्हटले आहे. चोक्सीच्या अटकेची बातमी कळताच हिंदुस्थानने विमानातून कागदपत्रे पाठवली होती. दोन दिवसांनंतर एंटिगांच्या पंतप्रधानांनी याबाबत खुलासा केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. डोमिनिकातील उच्च न्यायालयाने चोक्सीच्या प्रत्यार्पणाला बुधवारपर्यंत स्थगिती दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानने डोमिनिका सरकारकडे चोक्सीच्या प्रत्यार्पणासंबंधी ढीगभर कागदपत्रे पाठवली आहेत. चोक्सी एंटिगातून गायब झाल्यानंतर इंटरपोलने त्याच्याविरुद्ध ‘यलो नोटीस’ बजावली होती. 25 मे रोजी डोमिनिकामध्ये सीआयडी पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. तो क्युबामध्ये धूम ठोकण्याच्या तयारीत होता.

मुंबईतील घराच्या भिंती नोटिसांमध्ये हरवल्या

मुंबईतील वाळकेश्वर परिसरातील गोकुळ अपार्टमेंटच्या नवव्या आणि दहाव्या मजल्यावर चोक्सीचे कुलूपबंद घर आहे. त्याच्या घरावर ‘सीबीआय’, ‘ईडी’ अशा विविध तपास यंत्रणा आणि बँकांनी एवढय़ा नोटिसा चिकटवल्या आहेत की, घराचा दरवाजा आणि भिंती दिसेनाशा झाल्या आहेत. दरवाजाच्या पुढील भागात 2019 ते 2021 या तीन वर्षांत चोक्सीविरुद्ध जारी करण्यात आलेल्या नोटिसींचा खच पडला आहे.