मेहुल चोक्सीच्या मालमत्तेचा लिलाव, मुंबईतले फ्लॅट्स आणि मौल्यवान रत्नांचाही समावेश

पीएनबी (पंजाब नॅशनल बँक) घोटाळ्याचे 23 हजार कोटी रुपयांचे आरोपी मेहुल चोक्सीच्या 13 मालमत्तांची लिलाव प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. पीएमएलए न्यायालयाने 46 कोटी रुपयांच्या कंपन्यांच्या मालमत्तांच्या लिलावाला परवानगी दिली आहे. यामध्ये बोरीवलीतील एक फ्लॅट (किंमत 2.6 कोटी रुपये), बीकेसीमधील भारत डायमंड बोर्समधील कार्यालय आणि कार पार्किंगची जागा (किंमत 19.7 कोटी रुपये), गोरेगाव येथील सहा फॅक्ट्री (18.7 कोटी रुपये), चांदीच्या विटा, मौल्यवान रत्ने आणि कंपनीच्या अनेक मशीनरींचा समावेश आहे.

विशेष न्यायाधीश ए. व्ही. गुजराती यांनी म्हटले की, “जर या मालमत्ता अशाच पडून राहिल्या तर त्यांची किंमत सतत कमी होत जाईल. त्यामुळे त्यांचा लिलाव तात्काळ करणे आवश्यक आहे.”

न्यायालयाने असेही सांगितले की लिक्विडेटरने या लिलावातून मिळणारी रक्कम आयसीआयसीआय बँकेत फिक्स्ड डिपॉझिट स्वरूपात ठेवावी. एनसीएलटीने (राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण) 7 फेब्रुवारी 2024 रोजी लिक्विडेटरची नियुक्ती केली होती. त्यानंतर न्यायालयाने नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांच्या मालमत्तांचे मूल्यांकन करण्यास परवानगी दिली होती. सध्या नीरव मोदी ब्रिटनमधील तुरुंगात असून मेहुल चोकसी बेल्जियमच्या तुरुंगात आहे.