मेळघाटात अघोरी कृत्याचा सुळसुळाट, 26 दिवसाच्या बालकाला सराट्याने चटके

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमरावती जिह्यातील मेळघाटात आदीवासींच्या अघोरी कृत्याचा प्रकार पुन्हा उघडकीस आला आहे. चिखलदरा तालुक्यात असलेले बारुगव्हाण या आदीवासी खेडय़ात 26 दिवसाच्या कोवळ्या बालकास सराट्याने चटके देण्याचा प्रकार काल (दि.19) उघडकीस आला आहे. अलिकडच्या काही दिवसात मेळघाटात अंधश्रद्धेच्या माध्यमातून असेच अघोरी कृत्य सातत्त्याने घडत असून ही घटना याच आठवडय़ातील तिसरी आहे.

चिखलदरा तालुक्यातील बारुगव्हाण येथील सुनिता दिलीप चिमोटे हिला 26 दिवसापूर्वी बाळ झाले होते. या बाळाचे पोट फुगत असल्यामुळे भुमकाला (मांत्रिक) बोलाविण्यात आले. त्याने दिलेल्या सल्ल्यानुसार 26 दिवसाच्या या बाळाला गरम सराटय़ाने डागण्या देण्यात आल्या. त्यामुळे या बालकाची प्रकृती खालावली. ही बाब गावातील आशा वर्कर व अंगणवाडी सेविकाला कळल्यानंतर त्यांनी याची माहिती लगेच भरारी पथकाला दिली. भरारी पथक डॉ. आदीत्य पाटील यांनी तक्रारीची दखल घेऊन घटनास्थळ गाठले व त्यानंतर या बालकाला चुर्णी प्राथमिक स्वास्थ्य केंद्रात भरती करून घेतले. दरम्यान, या घटनेची माहिती डॉ. पाटील यांनी चिखलदरा पोलिसात दिली. सदर प्रकरणी पोलिसांनी आठ महिन्याच्या मुलाला डागण्या दिल्याच्या प्रकरणात गावातील दायी झनका कास्देकर व बालकाचे वडील संजु तोटा यांना अटक केली.