पंतप्रधानांच्या दुबई दौऱ्याचा आणि ‘मेलोडी’चा काय संबंध आहे?

शनिवारी सकाळी ट्विटरवरील सर्वात चर्चिल्या जाणाऱ्या विषयांच्या यादीत MELODI असा शब्द ट्रेंडमध्ये आला होता. अनेकांना वाटले की हा मेलोडी चॉकलेटशी संबंधित विषय असावा. मात्र हा विषय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुबई दौऱ्याशी संबंधित निघाला. दुबईमध्ये COP 28 शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेसाठी जमलेल्या राष्ट्रप्रमुखांचे एकत्रित फोटोसेशन करण्यात आले. यामध्ये हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी हे दोघे सगळ्यात पुढे होते.

हे दोन्ही नेते खूप खूश दिसत होते आणि एकमेकांशी हसून बोलत होते. स्वत:मेलोनी यांनी एक फोटो शेअर केला असून ज्यात त्यांनी ‘COP28च्या निमित्ताने एकत्र आलेले चांगले मित्र’ अशा आशयाचा मजकूर लिहिला आहे. यासोबतच त्यांनी #Melodi असा हॅशटॅगही लिहिला आहे. Melodi हा शब्द Meloni आणि Modi या आडनावातील काही अक्षरे वापरून तयार करण्यात आला आहे. जॉर्जिया मेलोनी यांच्या नावातील Melo आणि नरेंद्र मोदी यांच्या नावातील Di ही अक्षरे वापरून हा शब्द तयार करण्यात आला आहे.

जी20 परिषदेच्या निमित्ताने मेलोनी या हिंदुस्थानात आल्या होत्या. तेव्हा देखील पंतप्रधान मोदी आणि त्यांचे फोटो, व्हिडीओ बरेच व्हायरल झाले होते. अनेकांनी या दोघांच्या फोटो, व्हिडीओवरून गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या असून या प्रतिक्रिया देणाऱ्यांची आणि वाचणाऱ्यांची संख्या ही वाढत चालली आहे.