ममता बॅनर्जी यांचे ऐतिहासिक पाऊल; देशाला मिळणार पहिल्या LGBTQ राज्यसभा खासदार, कोण आहेत मेनका गुरुस्वामी?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तृणमूल काँग्रेसने आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी चार नावांची घोषणा केली आहे. यातील एक नाव ज्येष्ठ वकील मेनका गुरुस्वामी यांचे आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मेनका गुरुस्वामी यांना उमेदवारी जाहीर करून एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. त्या निवडून आल्यास देशातील पहिल्या LGBTQ राज्यसभा खासदार ठरतील.

मेनका गुरुस्वामी या सर्वोच्च न्यायालयातील एक ख्यातनाम ज्येष्ठ वकील आहेत. हिंदुस्थान समलैंगिकतेला गुन्हेगारीच्या श्रेणीतून बाहेर काढणाऱ्या (कलम 377 रद्द करणे) ऐतिहासिक न्यायालयीन लढाईत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून ‘बॅचलर ऑफ सिव्हिल लॉ’ आणि हार्वर्ड लॉ स्कूलमधून मास्टर्स पूर्ण केले आहे. ऑक्सफर्डच्या रोड्स हाऊसमध्ये त्यांचे पोर्ट्रेट लावले गेले असून असा मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या हिंदुस्थानी आणि जगातील दुसऱ्या महिला आहेत.

2019 मध्ये ‘टाइम मॅगझिन’ने जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत त्यांचा समावेश केला होता. तसेच ‘फॉरेन पॉलिसी’ मॅगझिननेही त्यांना जागतिक विचारवंतांच्या यादीत स्थान दिले आहे. त्यांनी हिंदुस्थानचे माजी ॲटर्नी जनरल अशोक देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या वकिलीची सुरुवात केली होती.

मेनका गुरुस्वामी यांनी अलीकडेच कोर्टात ‘I-PAC’ कार्यालयावरील ईडीच्या कारवाईविरोधात तृणमूल काँग्रेसची बाजू मांडली होती. त्यांच्या कायदेशीर कौशल्यामुळे आणि सामाजिक योगदानामुळे ममता बॅनर्जी यांनी त्यांना राज्यसभेची संधी दिली आहे. तृणमूल काँग्रेसने गुरुस्वामी यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो, पश्चिम बंगालचे माजी डीजीपी राजीव कुमार आणि प्रसिद्ध अभिनेत्री कोएल मल्लिक यांनाही आपले उमेदवार घोषित केले आहे.