
सामना ऑनलाईन । नैरोबी
पृथ्वीतलावर असे एक गाव आहे जेथे फक्त महिलाच राहतात. या गावात पुरुषांना अजिबात प्रवेश नाही. हे वाचल्यावर तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित झाले असाल. मात्र हे खरे आहे. केनियाची राजधानी असलेल्या नैरोबी शहराजवळ हे गाव आहे. महिलाराज असलेल्या या गावाचे नाव आहे ‘उमोजा’. या गावात कोणतीही महिला जाऊ शकते, राहूही शकते, मात्र पुरुषांना येथे ‘नो एन्ट्री’ आहे.
उमोजा गावाची स्थापना 1990 साली रेबेका लोलोसोली नावाच्या एका महिलेने 15 महिलांना सोबत घेऊन केली. या गावात फक्त कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिला तसेच बलात्कार पीडित महिलांना राहण्यास परवानगी आहे. या गावात विशेषकरून ब्रिटिश सैनिकांनी बलात्कार केलेल्या महिलांचा जास्त समावेश आहे. 16 वर्षांच्या तरूणीपासून ते 80 वर्षाच्या आजीबाईचे या गावात वास्तव्य आहे. दागिने बनवणे हा या गावातील महिलांचा मुख्य व्यवसाय आहे. येथील महिला डेटवर जाऊ शकतात, पुरुषांसोबत शारिरिक संबंध ठेऊ शकतात आणि लग्न करू शकतात. मात्र हे सर्व गावाच्या वेशी बाहेरच त्यांना करावे लागते. उमोजा गावावर पुरुषांनी अनेकवेळा हल्ला करून गावात घुसण्याचा प्रयत्न केला मात्र महिलांनी त्यांना वेळोवेळी हुसकावून लावले आहे. काहीवेळा तर घरातल्या बायका पळून उमोजा गावात राहायला आल्यामुळे देखील वाद झाले आहेत.


























































