आशिया चषक हॉकी स्पर्धेचे वेध; पाकिस्तानऐवजी बांगलादेश खेळण्याची शक्यता

पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानच्या जागी बांगलादेश संघाचा समावेश होऊ शकतो. ही स्पर्धा 29 ऑगस्टपासून बिहारच्या राजगीर येथे सुरू होणार आहे. पाकिस्तान हॉकी महासंघाने सुरक्षा कारणास्तव हिंदुस्थानात येण्यास नकार दिल्याने हा बदल घडू शकतो. केंद्र ‘पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा दिला जाईल, असे सरकारने आधीच स्पष्ट केले आहे, मात्र पाकिस्तानकडून अद्याप अंतिम पुष्टी झालेली नाही. आयोजकांनी आठ संघांच्या या स्पर्धेत पाकिस्तानच्या जागी बांगलादेशाला सहभागी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. हॉकी इंडियाच्या एका अधिकाऱयाने सांगितले की, ‘केंद्र सरकारने पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा देण्याची तयारी दाखवली आहे. मात्र, जर त्यांना हिंदुस्थानात यायचेच नसेल तर ती आमची समस्या नाही. पाकिस्तान संघ या स्पर्धेत सहभागी झाला नाही तर बांगलादेशला आधीच आमंत्रण दिले आहे, मात्र अंतिम पुष्टीसाठी आणखी 48 तास वाट पाहावी लागेल. पाकिस्तानकडून किंवा बांगलादेशकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.