पाडव्याचा मेन्यू

>> मीना आंबेरकर

प्रत्येक गृहिणीला आपले स्वयंपाकघर सुसज्ज ठेवायला आवडतेच. आज त्यासाठी अनेक आधुनिक उपकरणे परवडणाऱया किमतीत उपलब्ध आहेत.

आपण स्वयंपाक करताना आपल्याला वेगवेगळय़ा साधनांचा वापर करतो. त्यापैकी लागणाऱया आवश्यक अशा साधनांची आज आपण माहिती घेणार आहोत, ज्यामुळे आपला रोजचा स्वयंपाक सुकर होईल.

प्रथम म्हणजे स्वयंपाक करताना लागणारे पदार्थ मोजण्यासाठी, मोजून-मापून घेण्यासाठी एखादे साधन असणे जरुरीचे आहे. सर्वसाधारणपणे रोजचा स्वयंपाक करताना गृहिणी एखादा कप किंवा वाटी माप म्हणून वापरते. ते तिच्या दृष्टीने सोयीचे असते; परंतु एखादी खाद्यकृती (उदा. केक वगैरे) करण्यामध्ये योग्य मापन जरुरीचे असते. त्यासाठी बाजारात मेझरिंग ग्लास मिळतो, त्याचा वापर करावा.

भाजी वगैरे चिरण्यासाठी लागणारी विळी आता इतिहासजमा होत आहे. त्याऐवजी सुरी व चॉपिंग बोर्डचा वापर केला जातो. हा चॉपिंग बोर्ड लाकडी किंवा फायबर प्लॅस्टिकचा असतो. ब्रेड, भाज्या, मांसाहारी पदार्थ, फळे इ. कापण्यासाठी वेगवेगळय़ा आकाराच्या व कमीअधिक धारेच्या सुऱया मिळतात. स्वयंपाकघरात दुधाची पिशवी व इतर खाद्यपदार्थांची व जिन्नसांची पॉलिथिनची पाकिटे कापण्यासाठी हाताशी कात्री असावी लागते. फळांची किंवा भाजीची साले काढण्यासाठी सोलणी किंवा पीलर बाळगणे गरजेचे आहे. भाज्या व सुके खोबरे किसण्यासाठी स्वतंत्र किसणी व चीज, जायफळ किसण्यासाठी अशी वेगळी किसणी असावी. तसेच ओले खोबरे किसण्यासाठी नारळ खोवणीचा वापर करावा.

चिरलेल्या भाज्या आत टाकून धुण्यासाठी किंवा उकडलेल्या भाज्या, नूडल्स पाण्यातून वेगळय़ा करण्यासाठी रोवळय़ा वापरल्या जातात. उकडलेल्या बटाटय़ांचा लगदा करण्यासाठी पोटॅटो मेशर असावा लागतो. पुरणपोळी पुरण, सॉसच्या भाज्या, फळांचे रस काढण्यासाठी पुरणयंत्राचा वापर होतो.
स्वयंपाकघरात फोडणीसाठी, तळणासाठी, परतलेल्या भाज्या करण्यासाठी वेगवेगळय़ा आकाराच्या कढयांची गरज असते. स्वयंपाकघरात पेशर कुकर हे अत्यावश्यक साधन आहे. डाळ, भात, भाज्या शिजवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तसेच फोडणी देऊन त्यातच डाळ किंवा भाजी तयार होऊ शकते. तसेच फ्राय-पॅनचा वापरही भाज्या करण्यासाठी किंवा कमी तेलात तळण्यासाठी (शॅलो फ्राय) केला जातो. यात धिरडी, डोसे वगैरेही चांगले होतात. ही फ्राय पॅन नॉनस्टिक प्रकारची असतात. त्यामुळे तेलाचा वापर कमी होतो. त्यासाठी लाकडी चमचे वापरावे लागतात.

आधुनिक स्वयंपाकघरात मिक्सरचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. सुके वाटण, ओले वाटण, मसाला पूड वगैरे करण्यासाठी मिक्सरचा उपयोग होतो. त्यामुळे गृहिणीचे कष्ट व वेळ वाचतो.
याशिवाय आणखी अनेक उपकरणे आहेत, ज्यामुळे आपले स्वयंपाकघर सुसज्ज बनते. यथावकाश आपण त्यांचीही माहिती करून घेऊ.

श्रीखंड
साहित्य – 2 लिटर दूध, साखर, केशर, वेलची, जायफळ, चारोळी.
कृती – दूध तापवून त्याला विरजण लावावे. विरजण लागल्यावर दही स्वच्छ सुती कपडय़ात घालून टांगून ठेवावे. दहय़ातील पाणी निघूण गेल्यावर चक्का तयार होईल. साधारणपणे चक्का असेल तेवढीच साखर चक्क्यात घालावी. चक्का सारखा करून तो पुरणयंत्रातून गाळून घ्यावा, त्यात केशर खलून घालावे. वेलची पूड, जायफळ पूड घालावी. सर्व व्यस्थित एकत्र करून घ्यावे. वरून चारोळी टाकावी.

अळूची पातळ भाजी –
साहित्य – अळूची 8-10 पाने, चुका अर्धी जुडी, खोबऱयाचे काप पाव वाटी, काजूचे तुकडे पाव वाटी, शेंगदाणे पाव वाटी, 4 चमचे चणाडाळ, 5-6 ओल्या मिरच्या, सुपारीएवढी चिंच, 2 चमचे काळा गोडा मसाला, पाव वाटी गूळ, अर्धा चमचा मेथ्या, दोन ते तीन चमचे बेसन, फोडणीचे साहित्य, मीठ चवीनुसार.

कृती – अळू स्वच्छ धुऊन व देठय़ा सोलून चिरावे. चुका धुऊन चिरावा. चण्याची डाळ व शेंगदाणे भिजत घालावेत. थोडेसे तेल घालून त्यावर अळू टाकावे. दोन-तीन वाफा आल्यावर त्यात डाळ, दाणे घालावेत. चांगले शिजल्यावर चिंच कोळून घालावी. भाजी जेवढी पातळ असेल त्याप्रमाणे पाणी घालावे. मीठ, गूळ, गोडा मसाला, काजूचे तुकडे व खोबऱयाचे काप घालावेत. नंतर बेसन पाण्यात कालवून लावावे व भाजी चांगली शिजवावी. नंतर मेथ्या, मिरच्यांचे तुकडे, हिंग, मोहरी, हळद घालून फोडणी करावी व ती भाजीला द्यावी.

टिप्स
1) रोजच्या जेवणातील भाजी किंवा आमटीत कढीलिंब अवश्य घालावा. म्हणजे पचन सुधारते.
2) पुलाव मोकळा होऊन शिते चिकटू नयेत म्हणून शिजवण्यापूर्वी थोडे ताजे लिंबू पिळावे.

पंचामृत –
साहित्य – 1 वाटी गूळ, पाऊण वाटी चिंच, दोन चमचे गोडा मसाला, अर्धी वाटी तीळ, अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी खोबऱयाचे तुकडे, पाव वाटी ओल्या मिरच्यांचे तुकडे.
कृती – प्रथम हिंग, मोहरी, हळद घालून फोडणी करून घ्यावी. त्यात चिंचेचा कोळ घालावा. गूळ, मीठ, तिखट (चवीप्रमाणे), दाण्याचे कूट, तिळाचे कूट व गोडा मसाला, मिरच्या घालून चांगले उकळून घ्यावे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या