
खगोल शास्त्रातील दुर्मिळ घटना सोमवारी होणार आहे. सूर्यबिंबासमोरून बुध ग्रहाचे संक्रमण होणार आहे. सोमवारी संध्याकाळी 6.05 मिनिटांनी बुधाचे संक्रमण सुरू होणार असून रात्री 11.34 वाजता हे संक्रमण पूर्ण होणार आहे. त्यावेळी हिंदुस्थानात सूर्यास्त होणार असल्याने ही घटना हिंदुस्थानातून दिसणार नाही. ही खगोल अभ्यासकांसाठी मोठी पर्वणी असून ही घटना दुर्मिळ आहे. शतकातून फक्त 13 वेळा असे संक्रमण बघण्यास मिळते.
सोमवारच्या या संक्रमणानंतर 13 वर्षांनी 2032 मध्ये असे संक्रमण बघण्यास मिळणार आहे. याआधी 9 मे 2016 रोजी असे संक्रमण झाले होते. त्यावेळी सूर्य आणि बुध मेष राशीत होते. आता सूर्य आणि बुध तूळ राशीत राशीत असताना हे संक्रमण होत आहे. ज्योतिष शास्त्रातही या घटनेला वेगळे महत्त्व असून या घटनेने आर्थिक मंदीचे संकट अधिक गडद होण्याची आणि अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेत मोठे बदल होण्याची शक्यता ज्योतिषतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तसेच तूळ, वृश्चिक, धनू या राशींवरही या संक्रमणाचे परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधून बुध ग्रह मार्गक्रमण करतो, तेव्हा त्याला संक्रमण म्हणतात. सूर्याभोवती परिभ्रमण करताना अनेक ग्रहांचे संक्रमण होत असते. पृथ्वीहून फक्त बुध आणि शुक्राचे संक्रमण बघता येते. इतर ग्रह पृथ्वीपासून दूर असल्याने त्यांचे संक्रमण दिसत नाही. मात्र, यंदा बुधाचे संक्रमण सूर्यबिंबामधून होणार असल्याने ही घटना विशेष आहे. मध्यपूर्वेतील काही देश, युरोप, आफ्रिका, दक्षिण ग्रीनलँड, अंटार्टिका, अलास्कासह उत्तर आणि दक्षिण अमेरिका, प्रशांत महासागर आणि न्यूझीलंडमध्ये हे संक्रमण दिसणार आहे. हिंदुस्थानात सूर्यास्त होत असल्याने हे पूर्ण संक्रमण दिसणार नाही. मात्र, गुजरातच्या समुद्रकिनाऱ्याच्या भागातून, द्वारका, ओखा, पोरबंदरमधून सूर्यास्ताच्या वेळी संक्रमण सुरू होताना दिसणार आहे. हे संक्रमण नेहमी मे ते नोव्हेंबरमध्ये दिसते. यावेळी सूर्यबिंबासमोर बुध एका ठिपक्याप्रमाणे दिसतो. या शतकात अशा संक्रमणाच्या तीन घटना घडल्या आहेत. ही संक्रमणाची चौथी घटना आहे. या घटनेनंतर या शतकात 10 वेळा असे संक्रमण होणार आहे.





























































