सुपरस्टार मेस्सी करणार तिसऱ्यांदा निवृत्तीची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, सेंट पीटर्सबर्ग

रशियातील २१व्या फुटबॉल वर्ल्डकपमध्ये अर्जेन्टिनाचा सुपरस्टार लिओनेल मेस्सी पार सुपरफ्लॉप ठरला. त्यामुळेच माजी जगजेत्या अर्जेन्टिनाला उपांत्यपूर्व फेरीतच गारद व्हावे लागले आहे. हे अपयश ५ वेळा जगातील ‘सर्वोत्तम फुटबॉलर’चा किताब पटकावणाऱ्या मेस्सीने फारच मनाला लावून घेतले आहे.याआधी दोनदा त्याने फुटबॉल संन्यास घेण्याची घोषणा केली होती. पण जगभरातील करोडो चाहत्यांच्या प्रेमाखातर तो पुन्हा फुटबॉलमैदानात परतला होता. रशियातील विश्वचषकात त्याच्या पदलालित्याची जादू चाललीच नाही. त्यामुळे आपल्या अर्जेन्टिना संघाला तो जेतेपदाच्या लढतींपर्यंत पोहोचवू शकलेला नाही. सुपरस्टार मॅराडोनाकी खोज म्हणून ओळखला जाणारा मेस्सी फुटबॉल विश्वचषकातील आपल्या अपयशाने पार हताश झाला आहे.

गेल्याच आठवड्यात आपला ३१वा वाढदिवस साजरा करणाऱ्या मेस्सीला यंदाचा हा विश्वचषक विशेष मानवतेला नाहीय. त्याच्या नेतृत्वाखाली अर्जेन्टिनाला आईसलँडने १-१ असे बरोबरीत रोखले. त्यानंतर क्रोएशियाकडून ०-३ अशा मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. सुदैवाने नायजेरियाविरुद्धच्या लढतीत मेस्सीला सूर गवसला आणि अर्जेन्टिनाला २-१ अशा विजयानंतर बाद फेरीत प्रवेश मिळाला होता. उपउपांत्यपूर्व लढतीत मेस्सी चमकला. पण युवा दमाच्या फ्रान्सने बलाढ्य अर्जेन्टिनाला ४-३ असे पराभूत करीत स्पर्धेबाहेर काढले. या प्रभावाने मेस्सी अतिशय दुःखी झाला असून पुन्हा निवृत्तीच्या विचारांनी त्याच्या मनात दाटी केली आहे.

दोन वर्षांपूर्वीही घेतला होता संन्यास
स्पॅनिश क्लब बार्सिलोनाला मोठे यश मिळवून देणारा मेस्सी आपल्या देशाच्या संघाला मात्र विश्वचषकात यशाच्या शिखरावर नेऊ शकलेला नाही. २०१६च्या कोपा अमेरिका चषकात अर्जेन्टिनाने मेस्सीच्या अफलातून खेळाच्या बळावर अंतिम फेरीत प्रवेश केला होता. पण अंतिम लढतीत चिलीने पेनल्टी शूट आऊटमध्ये अर्जेन्टिनाला पराभूत केले. सलग दुसऱ्यांदा अर्जेन्टिना कोपा अमेरिका चषकाच्या जेतेपदापासून वंचित राहिला होता. त्यानंतर झालेल्या टीकेच्या भडिमाराने दुःखी झालेल्या मेस्सीने फुटबॉलमधून संन्यास घेतला होता. त्यावेळी मला जे करणे शक्य होते ते मी केले, पण अखेर यशाने हुलकावणी दिली. या अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मी फुटबॉलमधून निवृत्ती घेतोय असे उद्गार सुपरस्टार मेस्सीने काढले होते. या स्पर्धेत मेस्सीने ५ गोल नोंदवत उत्तम कामगिरी केली होती. पण त्याचा संघ मात्र विजेतेपदापासून वंचित राहिला होता. त्याचेच शल्य मेस्सीला सतावत होते. अखेर चाहत्यांच्या आग्रहाखातर मेस्सीने दोन महिन्यानंतर आपला क्रीडा सन्यास मागे घेत पुन्हा मैदानात पदार्पण केले होते. २०१४ च्या विश्वचषकातही अंतिम लढतीत अर्जेन्टिनाला जर्मनीने अतिरिक्त वेळेत १-० असे पराभूत केले होते. या लढतीत मेस्सीने गोल नोंदवण्याची एक सोपी संधी वाया घालवल्याने त्याच्यावर टीकेचा जोरदार भडीमार झाला होता. गोल्डन बूट जिंकूनही मॅराडोनाप्रमाणे अर्जेन्टिनाला विश्वचषक मिळवून देण्यात मेस्सी अपयशी ठरला होता.