ऑनलाइन शैक्षणिक अॅपविरोधात मेस्टाचा आवाज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनानंतर राज्यात शाळा सुरू झाल्या असल्या तरी ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली खासगी अॅप चालकांचा बाजार सुरूच आहे. शालेय शिक्षण विभागाची कोणतीही परवानगी नसताना ऑनलाइन शैक्षणिक अॅप्स पालकांकडून हजारो रुपये फी वसूल करीत आहेत. लॉकडाऊनपासून बेकायदा सुरू असलेल्या या अॅप्स चालकांवर कोणाचेच नियंत्रण नसल्याने अशा अॅपवर बंदी आणून त्यांना शुल्क नियामक कायदा लागू करावा, अशी मागणी महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनने (मेस्टा) केली आहे.

शालेय शिक्षणासोबतच उच्च शिक्षणातही खासगी कंपन्यांच्या शिक्षणासाठीच्या अॅप्सची बस्ताने बसली आहेत. मात्र या अॅप्सना शुल्क नियामक कायदा लागू नसल्याने त्याचा मोठा फटका शाळांना बसत आहे. तसेच सरकारचा करही मोठय़ा प्रमाणावर बुडत आहे. त्यामुळे या अॅप्सना तातडीने शुल्क नियामक कायदा लागू करावा, अशी मागणी ‘मेस्टा’चे संस्थापक-संचालक संजय तायडे-पाटील यांनी शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे केली आहे.