
Ray-Ban Meta स्मार्ट ग्लासेसमुळे सध्या अमेरिकेत मोठा वाद निर्माण झाला असून हे प्रकरण आता सॅन फ्रान्सिस्कोमधील फेडरल कोर्टात पोहोचले आहे. मेटाच्या या चष्म्याद्वारे रेकॉर्ड केलेले खाजगी व्हिडिओ आणि फोटो प्रत्यक्ष माणसांकडून तपासले जातात, असा आरोप मेटा कंपनीवर करण्यात आला आहे. क्लार्कसन लॉ फर्मने कॅलिफोर्निया आणि न्यू जर्सीमधील दोन ग्राहकांच्या वतीने हा खटला दाखल केला असून, कंपनीने प्रायव्हसीबाबत ग्राहकांची दिशाभूल केल्याचा दावा करण्यात आला आहे.
एका स्वीडिश वृत्तपत्राच्या अहवालानुसार, केनियामध्ये काम करणारे सब-कॉन्ट्रॅक्टर्स कर्मचारी रे-बॅन मेटा स्मार्ट ग्लासेसद्वारे रेकॉर्ड केलेल्या फोटो आणि व्हिडिओंचे विश्लेषण करत होते. व्हिडिओ लेबलिंगचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी याबाबत एक खळबळजनक माहिती दिली. ते म्हणाले व्हिडिओ विश्लेषणादरम्यान डेटा तपासताना त्यांना अनेकदा युजर्सचे अत्यंत वैयक्तिक क्षण, जसे की बाथरूममधील व्हिडिओ आणि लैंगिक संबंधांचे फुटेज आढळले आहेत. त्यामुळे ही बाब अत्यंत गंभीर असून युजर्सच्या खाजगी आयुष्यात हस्तक्षेप होत असल्याचा आरोप केला जात आहे.
या प्रकरणी तक्रार करणाऱ्या युजर्सने आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणणे की, त्यांनी मेटाच्या मार्केटिंग दाव्यांवर विश्वास ठेवून हे ग्लासेस खरेदी केले होते. जर कंपनीने आधीच स्पष्ट केले असते की रेकॉर्ड केलेले फुटेज त्रयस्थ व्यक्तींकडून (कॉन्ट्रॅक्टर्स) तपासले जाणार आहेत, तर त्यांनी हे ग्लासेस कधीच विकत घेतले नसते. कंपनीने जाणीवपूर्वक ही माहिती लपवून ठेवली आणि खोट्या दाव्यांच्या आधारे विक्री केली, असे या दाव्यात म्हटले आहे.
दुसरीकडे, मेटाच्या प्रवक्त्याने या कायदेशीर प्रकरणावर थेट भाष्य करण्यास नकार दिला असला तरी, त्यांनी स्पष्ट केले की जोपर्यंत युजर्स ‘Meta AI’ सोबत कंटेंट शेअर करत नाहीत, तोपर्यंत डेटा डिव्हाइसवरच राहतो. मात्र, जेव्हा युजर्स AI सुविधेचा वापर करतात, तेव्हा अनुभव सुधारण्यासाठी कधीकधी मानवी कॉन्ट्रॅक्टर्स डेटाचे पुनरावलोकन करतात. इतर टेक कंपन्या देखील अशाच प्रकारे काम करतात, असा युक्तिवाद कंपनीकडून करण्यात आला आहे.
























































