
मेट्रो-3 प्रकल्पाचा वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) ते वरळीपर्यंतचा दुसरा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या मार्गिकेवरील प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमही सज्ज असणार आहे. धारावी ते कफ परेडपर्यंतच्या 17 मेट्रो स्थानकांना जोडणाऱ्या 28 मार्गांवर बेस्टच्या 79 बसेस चालवण्यात येणार आहेत.
सद्यस्थितीत उपनगरी रेल्वेमार्गावरील प्रवाशांसाठी बेस्टच्या अनेक बससेवा कित्येक वर्षांपासून सुरू आहेत. त्याच धर्तीवर मेट्रो-3 मार्गिकेवरील प्रवाशांच्या सेवेत बेस्ट बसेस धावणार आहेत. या बसेस मेट्रो स्थानकापासून एक ते चार किलोमीटरच्या परिसरात चालवण्यात येतील, अशी माहिती बेस्ट उपक्रमातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. बेस्टच्या पुनरुज्जीवन योजनेचा भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर नुकतेच सविस्तर सादरीकरण करण्यात आले. त्याच अंतर्गत मेट्रो प्रवाशांसाठी बेस्ट बस नेटवर्कचा विस्तार करण्याचा प्रस्ताव मांडल्याचे समजते.
बेस्ट बससेवा विस्तारीकरणाच्या पहिल्या टप्प्यात धारावी-आचार्य अत्रे चौकदरम्यान 10 बस मार्ग निश्चित केले आहेत. मेट्रो स्थानकांना जोडणारी रिंग रूट सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे. लोअर परळ, नेहरू विज्ञान केंद्र, वरळी डेअरी, वरळी गाव, सी फेस, दादर, महापौर बंगला, माहीम, सायन व धारावी हे परिसर 29 बससेवेने मेट्रो स्थानिकांशी जोडले जाणार आहेत.
दुसऱ्या टप्प्यात दक्षिण मुंबईतील अधिक भागांना सेवा देणाऱ्या 18 मार्गांवर 50 बसेस धावतील. यात नेव्ही नगर, एनसीपीए, कुलाबा, वर्ल्ड ट्रेड सेंटर, मंत्रालय, नरीमन पॉइंट, गेटवे ऑफ इंडिया, बॅलार्ड पियर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, जेजे हॉस्पिटल, सँडहर्स्ट रोड, ग्रँट रोड, बाबुलनाथ, वाळकेश्वर, ताडदेव, हाजी अली, लोअर परळ, महालक्ष्मी हे परिसर जोडले जातील.