मेट्रो पुन्हा कोलमडली, डी. एन. नगर ते गुंदवली स्थानकादरम्यान सेवा विस्कळीत

डी. एन. नगर ते गुंदवली स्थानकादरम्यान मेट्रो सेवा विस्कळीत झाल्यामुळे रविवारी सायंकाळी सुट्टीच्या निमित्ताने घराबाहेर पडलेल्या प्रवाशांचे हाल झाले. काही तांत्रिक कारणामुळे मेट्रो मार्गिका–2 अ आणि 7 वरील सेवा सुमारे दोन तास खोळंबली. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही सेवा पूर्ववत सुरू झाल्याचे मेट्रो प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

तांत्रिक बिघाडामुळे रविवारी सायंकाळी मेट्रो मार्गिका–7 अ आणि 7 वरील सेवा विस्कळीत झाली. याचा फटका हजारो प्रवाशांना बसला. मेट्रो स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली. यासंदर्भात सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास स्पष्टीकरण देताना मुंबई मेट्रो प्रशासन म्हटले की, ‘काही तात्पुरत्या तांत्रिक अडचणीमुळे मेट्रो मार्गिका-2 अ आणि 7 वरील सेवांमध्ये विलंब होत आहे. प्रवाशांना होत असलेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. मेट्रो सेवा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी आमची टीम युद्धपातळीवर कार्यरत आहे.’

रात्री नऊ वाजताच्या सुमारास ही सेवा पूर्ववत झाली. ‘मेट्रो मार्गिका-2 अ आणि 7 वरील तांत्रिक अडचण दूर करण्यात आली असून ही सेवा वीकेण्ड वेळापत्रकानुसार सुरळीत होत आहे. प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत,’ असे मेट्रो प्रशासनाने सोशल मीडियावर सांगितले.