
पश्चिम बंगाल, आसामसह केरळमध्ये याच वर्षी विधानसभा निवडणुका पार पडणार असून भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची घोषणा केली आहे. भाजपने पक्षात प्रवेश केलेल्या ‘मेट्रोमॅन’ ई श्रीधरन (E Sreedharan) यांच्यावर डाव खेळला असून त्यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केले आहे. केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन एएनआयशी बोलताना याबाबत माहिती दिली.
Our party has announced that E Sreedharan will be the chief minister candidate (for Kerala assembly elections): MoS MEA and BJP leader V Muraleedharan pic.twitter.com/HC01OThQYm
— ANI (@ANI) March 4, 2021
याआधी ई. श्रीधरन यांनी राज्यपालपदात ‘पॉवर’ नाही, मला त्यामध्ये काडीचाही रस नाही. केरळमध्ये भाजपची सत्ता आणणे हे आपले मुख्य लक्ष आहे. केरळचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असे सांगत म्हटले होते.
‘मेट्रोमॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेले ई. श्रीधरन यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर गेल्या महिन्यात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तसेच पक्षाने संधी दिल्यास विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे ते म्हणाले होते.
पक्षप्रवेशापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना श्रीधरन यांनी ‘मन की बात’ बोलून दाखवली. केरळात भाजपची सत्ता यावी हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच आपण राजकीय आखाडय़ात उतरत आहोत. पक्षाने सांगितले तर विधानसभा निवडणूक लढण्याची आणि मुख्यमंत्रीपद सांभाळण्याची आपली तयारी असून राज्याच्या हितासाठी काम करणार असल्याचे 88 वर्षीय श्रीधरन म्हणाले.
केरळ विधानसभा निवडणूक
केरळमध्ये सर्व 14 जिल्ह्यांतील 140 विधानसभा मतदारसंघात एकाच टप्प्यात 6 एप्रिल रोजी मतदान पार पडेल. 2 मे रोजी मतमोजणी पार पडणार आहे.