घाटकोपर-वर्सोवा मेट्रोचे तिकीट दर कमी करा; मुंबईकरांची मागणी

565

घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा या ‘मेट्रो-1’ मार्गावरून गेल्या पाच वर्षांत 60 कोटी प्रवाशांनी प्रवास केला अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) दिली. एमएमआरडीएने ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइटवरून हा आकडा जाहीर केला. उत्पन्न वाढल्याने आता तिकीट दर कमी करावेत असे मत मुंबईकरांनी त्याला प्रतिसाद देताना व्यक्त केले.

8 जून 2014 पासून घाटकोपर ते वर्सोवा या मार्गावर मुंबईतील पहिली मेट्रो रेल्वे सेवा सुरू झाली. सहा वर्षांत म्हणजे सुमारे दोन हजार दिवसांमध्ये 60 कोटी प्रवाशांना सेवा देणारी ‘मेट्रो-1’ ही देशातील पहिलीच मेट्रो ठरली आहे. त्याबद्दल एमएमआरडीएने ट्विटरवर मुंबईकरांचे आभार मानले आहेत. ‘मेट्रो-1’ हा मार्ग 11.4 किलोमीटर लांबीचा आहे. त्या मार्गावर तिकिटाचे दर 10, 20, 30 आणि 40 रुपये असे आहेत. सार्वजनिक आणि खासगी भागीदारीत उभारण्यात आलेला देशातील हा पहिला मेट्रो मार्ग आहे. त्यात 69 टक्के भागीदारी रिलायन्स इफ्रास्ट्रक्चरची, 26 टक्के एमएमआरडीए आणि 5 टक्के विओलिया कंपनीची आहे.

शेकडो मुंबईकरांनी एमएमआरडीएच्या ट्विटला प्रतिसाद देऊन अभिनंदन केले असून आता तिकीट भाडे कमी होईल अशीही अपेक्षा व्यक्त केली आहे. मेट्रोचे साधारण 30 रुपये तिकीट भाडे गृहीत धरले तर इतक्या प्रवाशांकडून एमएमआरडीएला 1800 कोटी रुपये मिळाले आहेत. म्हणजेच ‘मेट्रो-1’ प्रकल्पाचे एकतृतीयांशपेक्षा जास्त पैसे वसूल झाले आहेत. त्यामुळे आता तिकिटाचे दर कमी करण्यास हरकत नसावी असे मत मुंबईकरांनी व्यक्त केले.

आपली प्रतिक्रिया द्या