
हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाच्या लॉटरीची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाने ठाणे शहर व जिल्हा, वसई येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत 5 हजार 285 घरांच्या विक्रीकरिता सोडत जाहीर केली आहे. इच्छुकांना सोमवारपासून अर्ज करता येणार असून घरांची संगणकीय सोडत 3 सप्टेंबरला ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृहात होईल. या घरांच्या किमती 25 ते 60 लाख यादरम्यान असतील अशी माहिती सूत्रांनी दिली. घरांसोबत सिंधुदुर्ग जिह्यातील ओरोस, कुळगाव-बदलापूर येथील 77 भूखंडांच्या विक्रीकरितादेखील सोडत जाहीर केली आहे.
कोकण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली ही सोडत पाच घटकांमध्ये विभागली आहे. 20 टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एकूण 565, 15 टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेअंतर्गत 3002, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेल्या सदनिका आहे त्या स्थितीमध्ये या योजनेअंतर्गत 1677 आणि 50 टक्के परवडणाऱया योजनेअंतर्गत 41 घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. इच्छुकांना https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज नोंदणी करता येईल.
असे आहे वेळापत्रक
सोडतीसाठी अर्ज नोंदणीचा शुभारंभ सोमवारी दुपारी 1 वाजता होणार आहे. इच्छुक 13 ऑगस्टला रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज तर 14 ऑगस्टला रात्री 11.59 वाजेपर्यंत अनामत रकमेचा भरणा करू शकतील. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी 21 ऑगस्टला तर स्वीकृत अर्जाची अंतिम यादी 1 सप्टेंबरला सायंकाळी 6 वाजता ‘म्हाडा’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे, तर 3 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता पात्र अर्जांची संगणकीय सोडत होईल.