लॉटरीआधीच म्हाडा मालामाल, केवळ अर्ज विक्रीतून कमावले 8 कोटी रुपये

म्हाडाच्या कोकण मंडळांच्या घरांसाठी येत्या शनिवारी ठाण्यात संगणकीय सोडत होणार आहे. मात्र या सोडतीपूर्वीच म्हाडा मालामाल झाली आहे. केवळ अर्जाच्या विक्रीतून म्हाडाने तब्बल 8 कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली आहे. तसेच शासनालादेखील जीएसटीच्या माध्यमातून 1 कोटी 42 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे.

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5354 घरांच्या आणि सिंधुदुर्ग जिह्यातील ओरोस, कुळगाव-बदलापूर येथील 77 भूखंड विक्रीकरिता जुलैमध्ये जाहिरात प्रसिद्ध केली होती. या सोडतीसाठी एकूण 1,84,994 अर्ज आले असून अनामत रकमेसह 1,58,424 अर्ज प्राप्त झाले आहेत. अनामत रकमेसह भरलेले अर्ज सोडतीसाठी पात्र ठरतात. घरांसाठी अर्ज भरताना म्हाडा अर्जदाराकडून अनामत रकमेसह 590 रुपये चार्ज आकारते. यात 500 रुपये अर्ज शुल्क आणि 90 रुपये जीएसटीचा समावेश असतो. अर्ज शुल्काचे 500 रुपये म्हाडाला मिळतात. अशा प्रकारे 1,58,424 अर्जाच्या विक्रीतून म्हाडाने 7 कोटी 92 लाखांची कमाई केली आहे. तसेच प्रतिअर्ज 90 रुपये जीएसटीच्या माध्यमातून 1 कोटी 42 लाख 58 हजार रुपये शासनाच्या तिजोरीत जमा झाले आहेत.

अनामत रकमेपोटी जमा झाले दीडशे कोटी

म्हाडाकडून अत्यल्प उत्पन्न गटाच्या अर्जदाराकडून 5 हजार रुपये, अल्प उत्पन्न गटाकडून 10 हजार रुपये, मध्यम उत्पन्न गटाकडून 15 हजार रुपये तर उच्च उत्पन्न गटाकडून 20 हजार रुपये आकारले जातात. अशा प्रकारे अनामत रकमेतून म्हाडाच्या तिजोरीत दीडशे कोटी रुपये जमा झाले आहेत. लॉटरीत अयशस्वी झालेल्या अर्जदारांना अर्ज शुल्क वगळून अनामत रक्कम परत केली जाते तर यशस्वी अर्जदारांच्या फ्लॅटच्या किमतीमधून अनामत रक्कम वजा केली जाते.