
सामना ऑनलाईन,मुंबई
हक्काच्या घरांचे स्वप्न साकार करण्यासाठी आतुर असलेल्या असंख्य मध्यमवर्गीयांना म्हाडाने गुड न्यूज दिली आहे. या वर्षीच्या म्हाडाच्या घरांच्या किमती 25 ते 30 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच म्हाडाच्या मुंबईतील 1194 घरांची लॉटरी काढण्यात येणार असून लॉटरीची तारीख आठवडाभरात घोषित करण्यात येईल. म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीनंतर अध्यक्ष उदय सामंत आणि दुरुस्ती मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
विकासकांकडून मिळणारी घरेही कमी किमतीत
पुनर्विकासानंतर विकासकांकडून म्हाडाला मिळणाऱ्या घरांच्या किमतीही कमी करण्यात येणार आहेत. उच्च उत्पन्न गटातील घरांच्या किमती रेडिरेकनरच्या 70 टक्के दराने विकण्यात येतील. उदाहरणार्थ उच्च उत्पन्न गटातील 1 कोटी 40 लाख रुपयांचे घर 99 लाख रुपयांना मिळेल. मध्यम उत्पन्न गटातील घरे रेडिरेकनरच्या 60 टक्के, अल्प उत्पन्न गटातील घर रेडिरेकनरच्या 50 टक्के व अत्यल्प उत्पन्न गटातील घरे रेडिरेकनरच्या दराच्या 30 टक्क्याने मिळेल. विकासकांकडून मिळणाऱ्या घरांची स्वतंत्र लॉटरी काढण्यात येईल, असे सामंत म्हणाले.
नाशिक, संभाजीनगर, नागपूरच्या किमतीही कमी
म्हाडाने नाशिकमध्ये 1 हजार 150, संभाजीनगरमध्ये 918 व नागपूरमध्ये 373 अशी 2 हजार 441 घरे बांधली आहेत; पण या घरांची विक्री झालेली नाही. त्यामुळे या घरांच्या किमती 20 ते 47 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती उदय सामंत व विनोद घोसाळकर यांनी दिली. बाजारभाव, सरकारचा भाव व विक्रीला काढलेला भाव यांची सरासरी काढून हे दर कमी केले आहेत. या घरांचे दर कमी करूनही विक्री झाली नाही तर ही घरे पोलिसांच्या घरांसाठी देण्याचा दुसरा प्रस्ताव तयार असल्याची माहिती त्यांनी दिली.

































































