मुख्यमंत्र्यांना वेळ मिळेना; कोकण मंडळाची लॉटरी रखडली

प्रशासकीय कारण देत पुढे ढकललेल्या म्हाडाच्या कोकण मंडळाच्या संगणकीय सोडतीला अद्याप मुहूर्त मिळाला नाही. संगणकीय सोडतीची तयारी पूर्ण होऊनदेखील केवळ मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्यामुळे सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न अधांतरीच आहे. सोडतीची नवीन तारीख कधी जाहीर होणार, याकडे सर्वसामान्य अर्जदारांचे लक्ष लागले आहे.

म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेल्या 5311 घरांच्या विक्रीसाठी 15 सप्टेंबरला सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला. या सोडतीसाठी 24 हजार 303 अर्ज प्राप्त झाले असून घरांसाठी 13 डिसेंबरला संगणकीय सोडत काढण्यात येणार होती. प्रशासकीय कारणास्तव ही सोडत पुढे ढकलली असून सोडतीची नवीन तारीख संबंधित अर्जदारांना एसएमएसद्वारे कळविण्यात येणार असल्याचे मंडळाने सांगितले होते, मात्र दीड महिना उलटून गेला तरी सोडतीची नवीन तारीख जाहीर न झाल्याने अर्जदार नाराज आहेत.

संगणकीय सोडतीच्या दृष्टीने आमची तयारी पूर्ण झाली आहे. सोडतीसाठी मुख्यमंत्र्यांची तारीख मिळावी यासाठी आमचे प्रयत्न आहेत. मुख्यमंत्र्यांची निश्चित वेळ मिळताच सोडतीची अधिकृत तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे एका अधिकाऱयाने सांगितले.