म्हाडाचा भोंगळ कारभार; मास्टर लिस्टवरील विजेते वेटिंगवरच

वर्षानुवर्षे संक्रमण शिबिरात राहणाऱया रहिवाशांना हक्काचे घर देता यावे यासाठी म्हाडाने मास्टर लिस्ट तयार करत संगणकीय सोडत काढली. त्यामुळे आपल्याला घराचा ताबा लवकर मिळेल, या आशेवर राहिलेल्या शेकडो विजेत्यांचा पुन्हा एकदा भ्रमनिरास झाला आहे. सोडतीनंतर विजेत्यांना तत्काळ म्हाडाकडून देकारपत्र मिळणे अपेक्षित होते, मात्र महिना होत आला तरी देकारपत्र न मिळाल्याने मास्टर लिस्टमधील विजेते ‘वेटिंग’वरच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वर्षानुवर्षे संक्रमण शिबिरात राहणाऱया रहिवाशांना हक्काचे घर मिळावे यासाठी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने ऐतिहासिक निर्णय घेत 28 डिसेंबरला मास्टर लिस्टवरील 265 भाडेकरू आणि रहिवाशांची पहिल्यांदाच संगणकीय सोडत काढली होती. संगणकीय सोडतीनंतर अर्जदाराने 15 दिवसांच्या आत उपमुख्य अधिकारी, पुनर्रचित गाळे विभाग यांच्याकडे स्वीकृती पत्र सादर करणे तसेच देकारपत्र प्राप्त झाल्यानंतर अर्जदाराने 45 दिवसांच्या आत देकारपत्रातील अटी व शर्तींची पूर्तता करून ताबा घेणे बंधनकारक आहे. अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता सदनिकेचे वितरण रद्द होईल, असे म्हाडाने म्हटले होते. मात्र संगणकीय सोडत होऊन महिना होत आला तरी म्हाडाकडूनच विजेत्यांना अद्याप देकारपत्र मिळालेली नाहीत.

अर्जदारांच्या कागदपत्रांची पुन्हा पडताळणी होणार

काही अर्जदारांनी खोटी कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याची तक्रार म्हाडाला प्राप्त झाली होती. त्यामुळे सोडतीमधील सर्व विजेत्यांच्या कागदपत्रांची पुन्हा पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पडताळणी झाल्यानंतर विजेत्यांना देकारपत्र पाठविण्यात येतील, असे मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.